स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची अयोध्येतील श्रीराम जन्मस्थळी उभ्या राहणाऱ्या मंदिराच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा रविवारी (दि. १७) येथील मालपाणी लाॅन्समध्ये संगमनेरकरांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक अशोकराव सराफ, सहसंघचालक सुभाष कोथमिरे, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, मनीष मालपाणी, श्रीकांत नळकांडे, सहप्रमुख ज्ञानेश आकसाळ, दीपक जोंधळे, विशाल वाकचौरे, प्रविण कर्पे, विवेक कोथमिरे, गिरीश डागा, प्रशांत जोशी, मंगेश सालपे, विरेश आडेप, ओंकार राठी, ज्ञानेश्वर बकरे उपस्थित होते.
स्वामीजी म्हणाले, आपल्या देशाचा आत्मविश्वास संपविण्यासाठी परकीय आक्रमकांनी गेली अनेक शतके आक्रमण करुन आपल्या पूर्वजांवर अनन्वीत अत्याचार केले. आपल्या देशातील मंदिरे उध्वस्त करण्यामागेही हेच कारण होते. प्रभु रामचंद्रांच्या जन्मस्थळी विक्रमादित्याने बांधलेले मंदिर जेव्हा बाबराने उध्वस्त तेव्हा भारतीयांनी मोठा संघर्ष केला. आजवर अनेकवेळा तो होत राहीला. अवघ्या तीन एकर जागेसाठी गेली पाच शतके वारंवार झालेल्या संघर्षात तीन लाखांहून अधिकांनी आपले प्राण दिले आहेत. गेल्या ५ ऑगस्ट रोजी त्याच जागी मंदिराचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भूमीपूजन झाले आणि आपल्या सर्वांच्या मनातून हरपलेला तो आत्मविश्वास पुन्हा एकदा निर्माण झाला.
प्रास्ताविक डॉ. मालपाणी यांनी केले. मालपाणी परिवाराच्यावतीने या राष्ट्रमंदिराच्या निर्मितीसाठी मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या ललितादेवी व सुवर्णा मालपाणी यांच्यासह उद्योजक राजेश, डॉ. संजय, मनिष व गिरीश मालपाणी आणि संगिता, अनुराधा, रचना व सुनिता मालपाणी यांच्या उपस्थितीत एक कोटी रूपयांचा धनादेश स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांना सुपूर्द करण्यात आला.
--------
फोटो नेम : १८ मालपाणी परिवार, संगमनेर
ओळ : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी मालपाणी परिवाराच्या एक कोटी रूपयांचा धनादेश स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांना सुपूर्द करण्यात आला.