सुधीर लंकेअहमदनगर : शेवगाव येथील श्रीराम मंदिर देवस्थानने त्यांच्या भूखंडांवर परमीट रुम सुरु होणार असल्याची कोणतीही कल्पना धर्मादाय आयुक्त कार्यालयाला दिली नाही. त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक लपवली, असा स्पष्ट ठपका नगरच्या धर्मादाय उपआयुक्तांनी श्रीराम मंदिराच्या विश्वस्तांवर ठेवला आहे. दरम्यान, विश्वस्तांनीही आता परमीट रुम बंद करण्याबाबत संबंधित भाडेकरुंना आदेश दिले आहेत.श्रीराम मंदिर ट्रस्टला इनाम म्हणून मिळालेल्या ३१ एकर भूखंडांचा विश्वस्तांनी मनमानीपणे गैरवापर केला असल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे. यातील काही भूखंडांवर दोन परमीट रुम सुरु असून अनेक भूखंडांवर विनापरवाना इमारती उभ्या राहिल्या आहेत. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर विधिमंडळातही प्रश्न उपस्थित झाला होता. यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरुन नगरच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील निरीक्षक ज्ञा.शि. आंधळे यांनी प्रारंभी चौकशी केली. मात्र, पहिल्या चौकशीत देवस्थानला ‘क्लिन चीट’ देण्यात आली होती. ‘लोकमत’ने या चौकशी अहवालाची साधार चिकित्सा केल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी फेरचौकशीचा आदेश दिला. देवस्थानचे भूखंड परमीटरुमसाठी भाड्याने देताना विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्तांना पूर्णत: अंधारात ठेवले असल्याची बाब निष्पन्न झाली आहे. भूखंडांचा परमीटरुमसाठी वापर केला जाणार असल्याची बाब कोणत्याही भाडेकरारात नमूद नाही, असा ठपका उपआयुक्त हि.का. शेळके यांनी ठेवला आहे. देवस्थानची जागा परमीट रुमसाठी देणे उचित नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.सहधर्मादाय आयुक्तांकडून दखलश्रीराम मंदिर भूखंड प्रकरणाची आता धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनीही दखल घेतली आहे. परमीटरुम बंद करण्याबाबत त्यांनी देवस्थानच्या विश्वस्तांना पंधरा दिवसांची मुदत दिली आहे.‘सज्जन’ भाडेकरु म्हणजे काय?नवीन भाडेकरु हे चारित्र्यवान आढळून येत नाही. तसेच गुंड प्रवृत्तीचे व भांडखोर लोक भूखंड भाड्याने घेऊन अतिक्रमण करण्याचा धोका आहे. त्यामुळे आम्ही मागील त्याच त्या सज्जन व चारित्र्यवान भाडेकरुंना भूखंड भाड्याने देतो, असा ‘अजब’ दावा विश्वस्तांनी दुसऱ्या चौकशीतही केला आहे. गंमत म्हणजे याच चौकशी अहवालात ‘आम्ही परमीटरुम बंद करण्याचा आदेश देऊनही संबंधित भाडेकरु ऐकत नाहीत’ असे विश्वस्तांनी नमूद केले आहे. भाडेकरु विश्वस्तांचे ऐकत नसतील तर ते ‘सज्जन’ कोणत्या निकषावर ठरतात? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. विश्वस्तांचे न ऐकणारे आणखी किती भाडेकरु आहेत? असाही प्रश्न आहे.विश्वस्तांनी दिला परमीट रुम बंद करण्याचा आदेशदेवस्थानचे भूखंड आम्ही परमीटरुमसाठी भाड्याने दिलेले नसून या भाडेकरुंनी विहित परवानग्या घेऊन नंतर तेथे परमीट रुम सुरु केले, असा बचाव देवस्थानच्या विश्वस्तांनी चौकशी समितीसमोर केला. अरुण उत्तम लांडे यांचे ‘हॉटेल अजिंक्य’ व प्रताप मुकुंद फडके यांचे ‘हॉटेल समर्थ’ हे परमीट रुम असून त्यांना परमीटरुम बंद करण्याबाबत आम्ही कळविले असल्याचे देवस्थानचे विश्वस्त दत्तात्रय त्र्यंबक गालफाडे यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. मात्र, आम्ही कोणता व्यवसाय करावा यावर विश्वस्त हे कायद्याने निर्बंध घालू शकत नाही, असे उत्तर भाडेकरु देत आहेत. भाडेकरुंच्या या उत्तरांमुळे आम्ही त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही गालफाडे यांनी जबाबात म्हटले आहे. आजवर विश्वस्तच या सर्वांना ‘सज्जन’ भाडेकरु असे संबोधत आले आहेत.बिगरशेतीचे दस्तावेजच नाहीतश्रीराम मंदिर देवस्थानच्या गट नंबर १३१३, १३१४ व १३१५ या भूखंडांवर मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. हा भूखंड शेतजमीन आहे. हा भूखंड बिगरशेती करण्यात आला असल्यास १९८५ सालापासूनच्या या दस्तावेजांची सय्यद आयुब बशीर यांनी माहिती अधिकारात तहसील कार्यालयाकडे मागणी केली होती. मात्र, असे कुठलेही दस्तावेज आढळून येत नाहीत, असे नायब तहसीलदारांनी लेखी कळविले आहे. त्यामुळे हे भृखंड बिगरशेती कधी झाले? तसे नसेल तर इमारती कशा उभ्या राहिल्या? असा कायदेशीर प्रश्न उपस्थित झाला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या मुद्याकडे चौकशीत दुर्लक्ष केले आहे.प्रांताधिका-यांकडे आज सुनावणीश्रीराम मंदिर देवस्थानच्या भूखंडांचे बेकायदेशीर भाडेकरार झाले असल्याबाबत यापूर्वी तहसीलदारांनी गत वर्षात दोनदा लेखी कळविले आहे. त्यामुळे संबंधित भाडेकरुंना नोटिसा बजावण्यात आल्या असून २२ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता प्रांताधिकाºयांसमोर सुनावणीसाठी बोलविण्यात आले आहे.