आमदार कानडे : वाहनचालकांची लवकरच नियुक्ती
श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सहा रुग्णवाहिका चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजातून प्राप्त झाल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
रुग्णवाहिका नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय होत होती. माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एका गरोदर महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने हेळसांड झाल्याची घटना घडली होती. हे प्रकरण शासन दरबारी मांडले होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मतदारसंघातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका द्याव्यात अशी मागणी केली होती. त्यास मंजुरी देण्यात आली अशी माहिती कानडे यांनी दिली.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ४५ वाहने खरेदी करण्यास नुकतीच मान्यता मिळाली आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील माळवाडगाव, बेलापूर, निमगाव खैरी, देवळाली प्रवरा, टाकळीमिया आणि मांजरी या सहा केंद्रांच्या सेवेत ही वाहने लवकरच दाखल होणार आहेत.
वाहन चालकांसाठी ई-निविदा काढून त्यांना मंजुरीही देण्यात आली आहे. वाहना सोबतच वाहनचालकांना नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील जनतेची मोठी सोय होणार आहे असे कानडे यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहने उपलब्ध होत असल्याने पालकमंत्र्यांचे आभारी आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
-----
आमदार निधीतून बेडस्
आमदार निधीमधून मतदारसंघातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी पाच बेड देण्याचे नियोजन केले आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा यामागे उद्देश आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व कष्टकऱ्यांना मोफत उपचार मिळतील. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबतची योजना तयार करत आहे अशी माहिती आमदार कानडे यांनी दिली.