श्रीरामपूर : श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. सहा कोटी रुपये खर्चाच्या या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. लवकरच कामाचे आदेश काढले जातील, अशी माहिती आ. लहू कानडे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे चौपदरीकरण प्रस्तावित होते. मात्र, कोरोना व लॉकडाऊनमुळे सरकारने खर्चाला कात्री लावली होती. आता मात्र त्याकरिता निधी उपलब्ध झाला आहे. आ. लहू कानडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला.
श्रीरामपूर शहरातील वेशीपासून पुढे दोन किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. सोमवारपासून त्यावर कार्यवाही अपेक्षित आहे. दोन्ही बाजूंनी १५ मीटर रुंदीकरण, तसेच साडेतीन फूट दुभाजक असा प्रशस्त रस्ता असेल. त्यामुळे श्रीरामपूरहून राहुरीकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्यामुळे लाभ होणार आहे.
दरम्यान, बाभळेश्वर ते नेवासा फाटा या राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले. त्याचबरोबर समृद्धी महामार्गाला जोडणारा श्रीरामपूर व वैजापूर हा रस्ता प्रस्तावित आहे. त्यामुळे वैजापूरहून औषधोपचार, तसेच बाजार समितीत शेतीमाल विक्रीकरिता येणाऱ्या लोकांचा ओघ अधिक वाढेल, असा विश्वास कानडे यांनी व्यक्त केला.
...
श्रीरामपूरला चारही बाजूने जोडणार
श्रीरामपूर शहराला चारही बाजूंनी मोठ्या रस्त्यांनी जोडण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यातून येथील एमआयडीसीला अधिक चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे आ. लहू कानडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
-------------