श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूरला नवीन मुख्यालयाचा दर्जा द्यावा या मागणीसाठी शहर व तालुक्यात रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभर शहरात शुकशुकाट होता.
स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने या बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, कार्याध्यक्ष बाबा शिंदे, संघटक अशोक उपाध्ये, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सभापती सुधीर नवले, काँग्रेस पक्षाचे सचिन गुजर, अशोक कानडे, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, मर्चंट असोसिएशन संजय कासलीवाल, मुक्तार शहा, सचिन बडदे, नागेश सावंत आदी सहभागी झाले होते.
रविवारी सकाळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ सभा पार पडली. यावेळी जिल्हा मुख्यालयासाठी श्रीरामपूर हेच योग्य असल्याचे प्रमुखांनी सांगितले. पुढील काळात लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.