रमेश कोठारी ।
श्रीरामपूर : तालुका व शहर काँग्रेस समितीच्या पदाधिकारी निवडी अनेक दिवसांपासून रखडल्या आहेत. त्यामुळे पक्ष कार्र्यकर्त्यांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून येत आहे. कोरोनाच्या संचारबंदीत शिथिलता आली असल्याने लवकरच निवडी होऊन आपली प्रमुख पदावर वर्णी लागेल अशी अपेक्षा कार्यकर्ते बाळगून आहेत.
जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी राजीनामा दिला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रभारी जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब साळुंके यांची नियुक्ती केली. तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अरुण नाईक यांची नियुक्ती केली. शहराध्यक्षपदी नुकतीच संजय छल्लारे यांची नियुक्ती करण्यात आली.
मात्र विधानसभेच्या निवडणुुका पार पडून सहा महिने उलटून गेले आहेत. तरीही तालुका व शहराची कार्यकारिणी घोषित झालेली नाही. पक्षांतर्गत कार्यक्रम, आंदोलने, मोर्चे आदींना त्यामुळे निमंत्रणे देता येत नाहीत. निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तालुकाध्यक्ष अरुण नाईक यांनीही ते मान्य केले. आमदार लहू कानडे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्याशी चर्चा करुन लवकरच निवडी होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी पक्षाची समिती, पदाधिकारी व कार्यकारिणी अस्तित्वात आलेली नाही. संचारबंदी शिथिल झाल्यामुळे सर्व काही व्यवस्थित पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली. दिवंगत नेते जयंत ससाणे यांची उणीव पक्षाला प्रकर्षाने जाणवते असे छल्लारे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील काँग्रेसची कार्यकारिणी अद्याप घोषित झालेली नाही. याद्या तयार असून प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनंतर पंधरा दिवसांत त्यांची घोषणा होईल.- बाळासाहेब साळुंके, जिल्हाध्यक्ष