गेल्या दोन दिवसांपासून पूर्वेच्या मराठवाड्याकडून बिगर मोसमी वादळी पावसाचे आगमन होत आहे. शुक्रवारी भामाठाण, कमालपूर, घुमनदेव या गोदावरी नदीकाठच्या शिवारात मध्यम पाऊस झाला. शनिवारी सायंकाळी याच दिशेने आलेल्या वादळी पावसाने सायंकाळी पाचच्या सुमारास दिलेल्या तडाख्यात खानापूर शिवारात बाळासाहेब बाबूराव आदिक, अशोक दगडू पंडित यांच्या घराचे पत्र्याचे छत उडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले. संसारोपयोगी सामान उघड्यावर आले. वरुण बाबासाहेब आदिक यांच्या शेतातील रोहित्रासह बाजूच्या शेतकऱ्याचे शेतातील विजेचे खांब जमीनदोस्त झाले. शेतकऱ्यांची जनावरे उघड्यावर आली. विजेचा खेळखंडोबा झाल्यामुळे घरगुती वापरासाठी पाण्याचे हाल होणार आहेत. महावितरणने तातडीने विजेचे खांब दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, शनिवारी श्रीरामपूर शहरासह वडाळा महादेव, उंदीरगाव, टाकळीभान, बेलापूर येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. उंदीरगाव मंडळामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली. उसाच्या शेतामध्ये पाणी तुंबले होते.
----
फोटो ओळी : शनिवारी गोदावरी नदीकाठच्या खानापूर येथे झालेल्या वादळी पावसाने घरांवरील पत्रे उडून गेले.