आॅनलाईन लोकमतश्रीरामपूर, दि़ २७ - नगरपालिकेच्या तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी ठेकेदारांना न केलेल्या कामाचे सुमारे ३ कोटी रुपये अदा केल्याची चर्चा श्रीरामपुरात सुरू आहे. असा प्रकार झाल्याचा मुख्याधिकाऱ्यांनी इन्कार केला आहे. तर नगराध्यक्षांनी असा प्रकार घडला असून याबाबत चौकशी करुन दोषींविरुद्ध कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या रस्त्याची कामे न करता ठेकेदारांनी बिले अदा केली, त्यापैकी शिवाजी चौक ते मौलाना आझाद चौक या रस्त्याचे ठेकेदार बी.बी.जगताप(कोल्हार) यांनी गेल्या आठवड्यातच रात्रीच्यावेळी घाईघाईने डांबरीकरण केले. त्यांनी काम सुरू करण्यापूर्वी नगराध्यक्षांना माहिती दिली नाही. तसेच काम सुरू असताना उपस्थित अभियंत्याने नगराध्यक्षांना याबाबत कार्यालयीन टिपणी सादर केलेली नाही.भुयारी गटार योजनेच्या ठेकेदारास २ कोटी ११ लाख ९५ हजार ३५५ रुपये व रस्ता कामाच्या ठेकेदारांना ८० लाख रुपये कामे न करता दिल्याबाबत नगरसेवक अंजूम शेख यांनी पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे आव्हान देत चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नगरसेवक राजेंद्र पवार यांनी चौकशीसाठी उपोषणाची नोटीस दिल्यानंतर या चर्चेला तोंड फुटले.उपोषणाची नोटीस मिळाल्यानंतर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेतली असता त्यांनी नगर पालिकेस समिती नेमण्याची सूचना करुन सरकारमार्फत चौकशी करण्याची जबाबदारी टाळीत नगरपालिकेकडेच चेंडू टोलविला. पालिका निवडणुकीपूर्वी नोव्हेंबर २०१६ मध्ये रस्ते ठेकेदार जगताप यांना काम न करता ८० लाख रुपये दिले गेले. भुयारी गटार योजनेचे ठेकेदार लक्ष्मी एंटरप्राईजेस (कोल्हापूर) यांना काम न करता २३ डिसेंबर २०१५ रोजी २ कोटी ११ लाख ९५ हजार ३५५ रुपये देण्यात आले. पालिकेचे ३ कोटी रुपये ठेकेदारांकडे काम न करता अडकले आहेत. एवढ्या मोठ्या रकमेचे व्याज कोणाकडून वसूल करणार? रस्त्याची कामे कधी होणार हा प्रश्न आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिकारी नेमून चौकशी करावी, अशी चर्चा यानिमित्ताने होत आहे.