श्रीरामपूर : शहर व तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. काढणीला आलेला गहू व कांदा पिकांना पावसाचा फटका बसला. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला व फळ पिकांचे उत्पादन यापूर्वीच वाया गेले होते. रब्बीतील पिकेही अवकाळी पावसामुळे हातची जाण्याची शक्यता आहे.बुधवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला पाऊस रात्री आठ वाजेपर्यंत कोसळला. शहरासह तालुक्यातील बेलापूर, उक्कलगाव, कारेगाव, वडाळा महादेव, खैरी निमगाव, उंदिरगाव, टाकळीभान यासह विविध भागांत जोरदार पाऊस पडला. अनेक गावात एक ते दीड इंच पाऊस झाल्याची माहिती मिळाली. रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा ही पिके काढणीला आली आहेत. हार्वेस्टिंग मशीन व मजुरांच्या सहाय्याने गव्हाची काढणी सुरू आहे. मात्र काल झालेल्या या पावसामुळे गव्हाचे उत्पादन वाया गेले आहे. पावसाबरोबर झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी गहू जमीनदोस्त झाला. त्याची सोंगणी करणे कठीण झाले आहे. शेतात काढणी करून जमा केलेला कांदा पावसामुळे भिजला. हा कांदा आता लवकर खराब होणार आहे. मात्र बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने कांदा विक्री होऊ शकणार नाही. परिणामी उत्पन्न वाया जाण्याची भीती आहे. महसूल प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. मात्र संचारबंदीमुळे त्यास अडचणी येणार आहेत.दरम्यान, वादळामुळे वीज वाहक खांब अनेक ठिकाणी कोलमडून पडले. बाभळेश्वर येथील वीज उपकेंद्रातून येणाºया वाहिनीला झालेल्या नुकसानीमुळे श्रीरामपूर शहराचा वीज पुरवठा बुधवारी रात्रीपासून बंद झाला आहे. तालुक्यातील अनेक गावे अंधारात होती. महावितरण विभागाचे कर्मचारी दुरुस्तीच्या कामाला लागले असले तरी गुरुवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. पाणीपुरवठ्याला त्यामुळे अडचणी आल्या.
श्रीरामपूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा; गहू, कांद्याचे नुकसान, वीजपुरवठा पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 1:39 PM