श्रीरामपूर : तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. टाकळीभान व बेलापूर मंडलांमध्ये दोन ते तीन इंच पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकांना त्यामुळे जीवनदान मिळाले आहे.
सुमारे पंधरा दिवस पावसाने ताण दिल्याने शेतक-यांनी विहिरी व बोअरवेलमधून पिकांना पाणी सुरू केले होते. भंडारदराचे आवर्तन सुरू असल्याने हे पाणीही पिकांना दिले जात होते. मात्र गुरुवारी रात्री शहर वगळता ग्रामीण भागामध्ये सर्वदूर चांगला पाऊस झाला.
टाकळीभान, भोकर, वडाळा महादेव, मुठेवाडगाव, बेलापूर, भेडार्पूर, मालुंजे, माळेवाडी, उंदिरगाव येथे ३० ते ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. टाकळीभान येथे सर्वाधिक ५५ मिलीमीटर तर बेलापूर येथे ४४ मिलीमीटर पाऊस झाला.
आजअखेर उंदिरगाव मंडलामध्ये २१० मिलीमीटर, बेलापूर येथे २२३ तर टाकळीभान मंडलात २६२ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.