लोकसंख्येने सर्वात मोठ्या बेलापूर ग्रामपंचायतीमध्ये तब्बल १० वर्षानंतर सत्तांतर झाले. येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले व जनता आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळविला. खंडागळे हे येथे जाएंट किलर ठरले. टाकळीभान येथील सत्तांतरात कान्हा खंडागळे यांनी महत्वाची भूमिका बजावली. पढेगाव येथे किशोर बनकर, भेर्डापूर येथे प्रताप कवडे, वडाळा महादेव येथे अविनाश पवार, कृष्णा पवार, दादासाहेब झिंज, सचिन पवार, तसेच मुठेवाडगाव येथे सागर मुठे, गोंडेगाव येथे सागर बडे, गोवर्धन येथे राहुल जगताप, मातुलठाण येथे अजित कणसे या तरुणाईकडे गावची सूत्रे आली आहेत.
गावपातळीवरील राजकारणामध्ये दर दहा वर्षानंतर नव्या पिढीचा उदय होतो. नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार होते. श्रीरामपूर तालुक्यात आता या तरुणाईला ग्रामीण विकासाची कामे करून आपला करिष्मा दाखविण्याची संधी आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी येथून पुढील काळात नेतृत्व येणार आहे. मात्र असे असले तरी पाय जमिनीवर ठेऊन व प्रसंगी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन त्यांना राजकीय प्रवास करावा लागेल. तालुक्याच्या राजकारणात त्यांना काम करण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे.
----------