अकोले : अगस्ती साखर कारखान्याची निर्मिती अवघ्या ३५ कोटीत झाली आणि आता त्यावर अडीचशे- तीनशे कोटींचा बोजा चढविणारे झारीतील शुक्राचार्य यांना बाजूला करा. कारखाना उर्जितावस्थातेत आणण्यासाठी पाहिजे ती मदत करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. यावेळी पवार यांनी माजीमंत्री मधुकर पिचड यांच्यावर त्यांचे नाव न घेता टिका केली.
शरद पवार यांच्या हस्ते लोकनेते आमदार यशवंतराव भांगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शेंडी-भंडारदरा येथे रविवारी झाले. यावेळी ते बोलत होते. पक्ष सोडून जाणारे अनेक पाहिले पण डगमगलो नाही.१९८० ला ५६ पैकी ५० आमदार मला सोडून गेले होते. त्याच्या पुढच्या निवडणुकीत सोडून गेलेले ४८ आमदार पराभूत झाले. ही किमया जनता घडवते. अकोलेतील जनतेने दाखवून दिले आहे. भांगरे कुटुंबाने सामंजस्याची भूमिका घेतल्याने परिवर्तन झाले. असेच सामंजस्य टिकून ठेवा. विकास कामांसाठी बांधिलकी ठेवून काम करा. गोळ्यामेळ्याने रहा. तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही पवार यांनी दिली.
गेले वर्षभर १० लॉकडाऊन व कोरोना यामुळे विकास कामावर परिणाम झाला. तालुक्याचा पर्यटन विकास कामासाठी हिमालयासारखा आमदार लहामटे व अशोक भांगरे यांच्या पाठीशी उभा राहील. अकोले तालुक्याची पर्यटनासाठी देशात ओळख होईल असे काम करून दाखवू, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.