राजस्थान मधील भरतपूरमधील उंच डोंगराच्या रांगामधून योगेश हे स्वत: मार्ग काढीत होते़ नवा रस्ता तयार केल्यावर त्याला मार्गदर्शक खुणा द्यायचे कामही योगेश करीत होते़ ही मोहीम म्हणजे आपले जीवन मागे सोडून द्यायचे अशीच होती़ पण एकदा सियाचीनमध्ये अशी मोहीम फत्ते केल्याने योगेश काटे यांनी देशभक्तीतून यशस्वीपणे मोहीम राबविली होती.पारनेर तालुक्यातील अळकुटीजवळ रांधे गाव आहे़ रांधे गावात विनायक काटे व रंजना काटे यांचा योगेश हा एकुलता एक मुलगा. योगेशला सीमा व प्रगती या दोन बहिणी. असे हे पाच जणांचे काटे कुटुंब! घरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे़ योगेश यांचे पहिली ते सातवी शिक्षण रांधे गावातील प्राथमिक शाळेतच झाले़ नंतर त्यांनी आठवी ते बारावीपर्यंत अळकुटी येथील रयत शिक्षण संस्थेच्या साईनाथ माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले़ मोठी बहीण सीमा यांनी बी़ ए. पूर्ण केले, तर लहान बहीण प्रगती शिक्षण घेत आहे.लहानपणीच ठरले सैन्यभरतीचे ध्येययोगेश यांच्या भरतीचे ध्येय लहानपणीच ठरले. लहानपणी पोलिसाचे व सैनिकाचे कपडे घालण्याचे त्यांना वेड होते. सैनिकाचे कपडे आणायाचा त्यांचा आई-वडिलांकडे सतत आग्रह असायचा. घराच्या मागे वनविभागाच्या जमिनीत वाळुचे पोते करून ते उचलून योगेश व्यायाम करायचे. दररोज रांधे फाट्यापर्यंत पळत जायचे़. सैन्यात भरती व्हायचेच, असा त्यांचा ध्यास होता. स्वत: भरती झालाच पण त्यांनी बहीण प्रगती हिलाही सैन्यात किंवा पोलिसात भरती होण्याचा आग्रह धरला. बारावी शास्त्र शिक्षण झाल्यावर आळे येथील बाळासाहेब जाधव कॉलेजमध्ये शिक्षण सुरू केले़ ते एनसीसीत दाखल झाले. त्यांचे उत्कृष्ट संचलन, शिस्त व भरतीपूर्व प्रशिक्षणात ते अग्रेसर होते़ म्हणून त्यांना बेस्ट एनसीसी कॅडेट पुरस्काराने गौरविण्यात आले होते़ त्याचदरम्यान ते पुणे येथे सैन्यदलात २७ मार्च २००८ मध्ये भरती झाले़. विज्ञान शाखेचे शिक्षण घेतल्याने त्यांना नर्सिंग विभागात भरती करून घेण्यात आले होते़. पुणे येथे भरती झाल्यानंतर अंबाला, लखनौ, सियाचीन, आग्रा येथे त्यांचे प्रशिक्षण व सेवा झाली़देशासाठी नवा रस्ता शोधला आणि देह सोडलाशहीद जवान योगेश विनायक काटे हे नर्सिंग सहायक म्हणून सैन्यात भरती झाले होते़ मात्र त्यांचा अभ्यास व काम करण्याची जिद्द पाहून लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योगेश यांना भरती झाल्यानंतर पहिल्याच वर्षी सियाचीन या अतिपहाडी भागात नवीन लष्करी तळ शोधणे व रस्ता शोधून तेथे सुविधा निर्माण करण्यासाठी पाठवले होते़ ही यशस्वी कामगिरी योगेश यांनी पूर्ण केली़ त्यामुळे त्यांना लान्सनायक पदवी प्रदान करण्यात आली होती़ शहीद योगेश यांच्यावर अवघ्या सहा वर्षांत असंख्य मोठ्या जबाबदाºया देण्यात आल्या होत्या़ २०१४ मध्ये योगेश यांच्यासह युनिट मधील २४ जणांना राजस्थान जिल्ह्यातील भरतपूर मधील पहाडी भागात ‘मिशन ओरीएंटेड रॉक कलोंबींग’ या मोहिमेवर पाठवण्यात आले होते़ योगेश यांनी याच मार्गावर पूर्वी दोन वेळा चढाई केली असल्याने त्यांना पुन्हा या विशेष मोहिमेवर पाठवण्यात आले होते़ यामध्ये पहाडी भागात युध्दाची परिस्थिती आल्यावर कशाप्रकारे तोंड द्यायचे, याचा अभ्यास करावा लागत होता.़ शिवाय या भागात शत्रूंचे सैन्य किंवा अतिरेकी घुसून आले तर कोणत्या भागात भारतीय सैन्य जावून युध्द करू शकेल किंवा त्याला जाण्यासाठी कोणत्या मार्गाने रस्ता असेल याची माहिती या मिशनमध्ये होती़.पारनेर तालुक्यातील रांधे, दरोडी या डोंगराळ भागात लहानपणी फिरण्याचा अनुभव योगेश यांच्या पाठीशी असल्याने डोंगराच्या बाजूने चांगला व धोकादायक नसलेला रस्ता तयार करून योगेश आपल्या टीमसह आगेकूच करीत होते़ योगेशचे रस्ता तयार करण्याचे काम जोरदारपणे सुरू होते़ अनेक लांबीचे रस्ते तयार करून सर्वजण अत्यंत खोल दरी, उंच पहाड अशा अत्यंत धोकादायक भागात शिरले होते़ या भागात रस्ता तयार करण्याचे अत्यंत कठीण काम होते.़ तरीही योगेश यांनी सहकाºयांना घेऊन आपले काम सुरूच ठेवले़ १३ मार्च २०१४ चा तो दिवस होता़ योेगेश यांनी सहकाºयांना कठीण रस्ता सोडून सोप्या मार्गाने आणण्याचा रस्ता तयार केला़ सर्वांना त्याच मार्गाने आणले़ मात्र त्यांच्यातील एक सहकारी कठीण मार्गाच्या रस्त्यातच अडकला. त्याने आवाज दिल्यावर योगेश हे पुन्हा मागे फिरले आणि त्या सैनिकाच्या खांद्यावरील सर्व साहित्य स्वत: घेतले. त्याला त्या कठीण मार्गातून पुढे नेण्याचा प्रयत्न करीत होते. खांद्यावर स्वत:चे साहित्य व पुन्हा सहकारी सैनिकाचे साहित्य असे घेऊन कठीण मार्गातून सैनिकाला घेऊन मार्ग करीत होते. असे असतानाच एका उंच पहाडी भागात योेगेश यांच्याकडे डोंगर चढताना लावण्यात आलेले खिळे तुटून पडले आणि ते खोल दरीत कोसळले़ दरीत कोसळल्यानंतरही त्यांनी स्वत:ला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला़ परंतु दुपारी दोनच्या सुमारास ‘भारतमाता की जय’ ची घोषणा देऊन योगेश यांनी देशासाठी प्राण सोडला़राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार राहून गेलायोगेश काटे यांनी सहा वर्षात कमीत कमी सुट्टी घेऊन सियाचीन असो किंवा भरतपूर. कोणत्याही कठीण ठिकाणी जायचे झाल्यास प्रथम त्यांचीच आघाडी होती़ सियाचीन येथे दोनवेळा खडतर मार्गातून सोपा रस्ता शोधणे, भरतपूर येथेही पहाडी भागातही खडतर प्रशिक्षण व लष्करी तळास जागा शोधण्याचे काम केले. प्रत्यक्ष जाऊन रस्ता व जागा तयार करून त्यांच्या टीमने देशासाठी मोठे कार्य केले होते. म्हणूनच योगेश व त्यांच्या टीमचा एप्रिल २००८ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येणार होता़ मात्र त्या आधीच योगेश देशासाठी शहीद झाले़ग्रामपंचायतीने दिली जागा, ग्रामस्थांनी बनवले स्मारकशहीद योगेश काटे यांनी देशासाठी दिलेले योगदान मोलाचे आहे़ त्यांच्यामागे वडील विनायक व आई रंजना, मोठी बहीण सीमा संतोष म्हस्के व लहान बहीण प्रगती महेंद्र झिंजाड असा परिवार आहे़ अळकुटी व म्हस्केवाडीतच त्यांच्या बहिणी राहत असल्याने त्या अधूनमधून आई-वडिलांकडे येऊन त्यांची काळजी घेतात़ या कुटुंबीयांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़ शहीद जवान योगेश यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी त्यांच्या पार्थिवावर लपेटलेला तिरंगा बरेच काही सांगून जात होता, हे ग्रामस्थांच्या लक्षात आले. योगेशचे स्मारक बांधून ग्रामस्थांच्या कायम स्मरणात ठेवायचे व भावी पिढीलाही त्यांच्या कार्याचे कायम स्मरण करून द्यायचे म्हणून त्यांचे स्मारक उभारावे, यासाठी बाळासाहेब काटे यांनी पुढाकार घेतला. त्याला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. तत्कालीन सरपंच कै.लक्ष्मण आवारी, उपसरपंच सोन्याबापू आवारी, सदस्य सुधाकर आवारी, साईनाथ झिंजाड, विनोद फापाळे, अविनाश आवारी, सुरेश सरोदे, दिलीप आवारी यांची एकत्रित ‘शहीद जवान योगेश काटे स्मारक समिती’ बनवली गेली़ सरपंच लक्ष्मण आवारी यांनी ग्रामपंचायतीची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून दिली़ मुंबईकर मंडळी व ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून योगेश काटे यांचे स्मारक उभे केले. १३ मार्च २०१६ मध्ये स्मारकाचे लोकार्पण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार विजय औटी, सुजीत झावरे, डॉ़ भास्कर शिरोळे, रामदास भोसले, विश्वनाथ कोरडे, मधुकर उचाळे यांच्या हस्ते करण्यात आले़ रांधे गावात भव्य स्मारक उभे राहिले़ दरवर्षी १५ आॅगस्ट, २६ जानेवारी रोजी या स्मारकात सामूहिक वंदना होते. दिवाळीमध्ये शहीद जवान योगेश कुटे यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी संतोष काटे व गावातील युवकवर्ग पुढाकार घेतात.
- शब्दांकन : विनोद गोळे