महाराष्ट्रातील बहुतांशी गावांमधील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती सैन्यात दाखल असण्याची परंपरा त्या गावासोबतच राज्याचा गौरव वाढवत आहे़ स्वत:च्या आयुष्याची होळी करून देशवासियांच्या आयुष्यात दिवाळी आणणाऱ्या या जिगरबाज परंपरेतील अनेक वीर या देशासाठी फक्त जगलेच नाहीत तर त्यापैकी काहींनी बलिवेदीवर स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करून प्राणार्पण केले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देण्याचे सौभाग्य लाभणे हा सर्वोच्च सन्मान मानला जातो़ हे भाग्य लाभलेले शेवगाव तालुक्यातील वीर जवान म्हणजे लान्स नाईक शहीद मच्छिंद्र दत्तात्रय लोढे !शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथे शहीद मच्छिंद्र दत्तात्रय लोढे यांचा १ जुलै १९६७ रोजी शेतकरी कुटुंबात जन्म झाला़ येथेच त्यांचे कुटुंबीय आजही राहतात. याच गावातून प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी शेवगावच्या न्यू आर्ट्स कॉलेजमधून पदवी घेतली. घरात सैन्यदलाचा कोणताही वारसा नसताना देशप्रेमाच्या ओतप्रोत भावनेने दिलेला कौल प्रमाण मानून त्यांनी २८ आॅक्टोबर १९८७ साली भारतीय सैन्यात ते शिपाई पदावर राष्ट्रीय रायफल १५ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले, तेव्हाचे त्यांचे शब्द होते, ‘आज मी सैन्यात भरती झालो. माझे अर्धे स्वप्न पूर्ण झाले, प्रत्यक्ष युद्धात भाग घेऊन शत्रूच्या सैन्याचा खात्मा करील तेव्हाच माझे स्वप्न खºया अर्थाने पूर्ण होईल’ सैन्य दलाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून बेळगाव येथे त्यांचे पहिले पोस्टिंग झाले. सैन्य दलातील कडक शिस्त आणि जबाबदाºया उत्तम पद्धतीने पार पाडत त्यांनी अनेक मित्र जोडले़ त्यांचे अधिकारी देखील त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि प्रखर राष्ट्रनिष्ठेचे प्रशंसक बनले़ नोकरीत प्रमोशन घेत मच्छिंद्र यांची लान्स नाईक पदावर बढती झाली आणि ते अहमदाबाद येथे दाखल झाले़ तिथेही त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा अल्पावधीतच उमटवला . या दरम्यान त्यांचा विवाह आखेगाव येथील मंगल काटे यांच्याशी झाला़शहीद मच्छिंद्र लोढे यांच्या व्यक्तिमत्वात मुळातच एक निडरपणा असल्याचे त्यांचे गावाकडचे मित्र आणि बंधू सांगतात. गावाकडे सुट्टीसाठी आल्यावर मित्रांशी बोलताना कधी आतंकवाद, भारत-पाकिस्तान युद्ध हे विषय निघालेच तर त्यांचे म्हणणे असे, ‘सैनिकाला भीती हा शब्दच माहित नसतो, आम्ही सैनिक हरण्यापेक्षा मरणे पसंत करू मात्र मरताना एकटे नक्कीच जाणार नाहीत तर पाच-सहा शत्रूंना सहज घेऊन जाऊ’१९९३ साली त्यांची बदली श्रीनगर येथे झाली. श्रीनगर येथे बदलून जाताना चार-आठ दिवसात त्यांची हवालदार या पदावर पदोन्नती होणार होती. काश्मीर अशांत असल्याने जरा जपून असा सल्ला त्यांना आप्तेष्ट आणि मित्रांनी काळजीपोटी दिला होता़ तेव्हा ते हसून म्हणाले होते , ‘जिथे माझी सगळ्यात जास्त गरज आहे तिथे बदली मिळाल्याचा मला खूप आनंद आहे, तुम्ही माझी काळजी करू नका, मी या देशाच्या सैन्य दलात आहे म्हणजे जगात सगळ्यात जास्त सुरक्षित आहे ही खात्री बाळगा’ श्रीनगर येथे हजर होऊन त्यांना अवघे चारच दिवस झाले होते़ आणखी चार दिवसांनी आपली पदोन्नती हवालदार पदावर होणार याचा त्यांना आनंद होता़ याचवेळी त्यांच्या जेष्ठ अधिकाºयांना सोडण्याची जबाबदारी त्यांना व त्यांच्या एका सहकारी मित्राला देण्यात आली. आदेशाचे पालन हा सैन्याचा पहिला नियम असतो़ लष्कराच्या वाहनातून अधिकाºयांना हेडक्वॉर्टरला पोहोचवून ते त्याच वाहनातून सहकारी मित्रासोबत गावाकडच्या आठवणीत रमत, गप्पा गोष्टी करत परत येत होते़ त्यांना खरेतर आता घरची ओढ लागली होती त्याला कारणही तसेच होते़ त्यांची पत्नी गर्भवती होती. तिला भेटण्याची ओढ त्यांना लागलेली होती़ आता हवालदार पदाचे प्रमोशन घेतले की महिन्याभराची रजा घेऊन गावी जाऊन येतो असे ते मित्राला सांगत असतानाच त्यांच्या लष्करी वाहनावर अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात क्षणात होत्याचे नव्हते झाले, सारी स्वप्ने, संकल्प धुरात आणि आगीत जाळून नष्ट झाली! मच्छिंद्र लोढे हे शहीद झाले़ त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या अंत्यविधीला श्रीनगर येथे पोहोचताही आले नाही़ तीन महिन्यांच्या गर्भवती असलेल्या आणि अवघे अठरा वर्षे वय असलेल्या मंगल या क्षणात वीरपत्नी ठरल्या.‘वंदेमातरम’ ही घोषणा ज्या देशात क्षूद्र राजकारणाचा वादग्रस्त विषय ठरते, ज्या देशात तथाकथित उच्चशिक्षितांचा ‘ब्रेन ड्रेन’ ही नित्य बाब ठरते, ज्या देशात नव्याने उदयाला आलेला अतिधनाढ्य आणि अतिश्रीमंत वर्ग ‘समाजसेवा’ हे थोतांड समजतो आणि या सर्वांसह तथाकथित बुद्धिजीवी वर्ग आपल्या मुलामुलीना लष्करी सेवा करणे, सैन्यदलात दाखल होणे कमीपणाचे समजतो अशा देशाच्या सीमा आजही सुरक्षित आहेत़ खेड्यापाड्यातील, ग्रामीण दुर्गम भागातील देशप्रेम आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने हा देश माझा आहे आणि याच्या सीमांचे रक्षण ही माझी जबाबदारी आहे़ हे भान स्वयंप्रेरणेने जपणाºया निधड्या छातीच्या युवकांच्या जिगरबाज राष्ट्रनिष्ठेच्या बळावर! त्यापैकी अनेक अल्पशिक्षित असतील, शहरीकरणापासून आणि अत्याधुनिकतेपासून कोसो दूर असतील पण देश रक्षणाच्या बाबतीत त्यांच्या इतके जागरूक, अभिमानी आणि समर्पित तेच!गावात पुतळा उभारलामच्छिंद्र लोढे शहीद झाल्यानंतर त्यांच्या मूळगावी मजलेशहर येथे उभारलेला त्यांचा पुतळा या गावाचे शौर्य आणि त्याग या परंपरेचे प्रतीक बनून पंचक्रोशीतील युवकांना स्फूर्ती देत आहे़ दरवर्षी १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला या गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी प्रभात फेरी काढून पुतळ्याला अभिवादन करताना देशप्रेमाची बीजे त्यांच्या कोवळ्या मनात रुजली जाताना शहीद लोढे नक्कीच मनोमन सुखावत असतील.वडिलांचा अभिमानमच्छिंद्र लोढे यांचा मुलगा नारायण लोढे आज इंजिनिअर झाला आहे़ आपल्या आजोबा आणि आईसह तो आखेगाव येथे राहतो आहे. आपण वडिलांना पाहू शकलो नाही पण त्यांच्या पराक्रमाचा आणि शौर्याचा वारसा याचा मात्र आपल्याला रास्त अभिमान असल्याचे तो सांगतो !सैन्य दल काळजी घेतेमाझे पती अतिशय निडर आणि धाडसी होते. आपल्या लष्करी गणवेशाचा त्यांना सार्थ अभिमान होता . देश आणि सैनिकी पेशा हे त्यांचे पहिले प्रेम होते. भीती हा शब्दच त्यांना माहिती नव्हता. वीरपत्नी म्हणून त्यांच्या पश्चात जगताना सैन्यदलातील अधिकारी आमची कुटुंबाचा भाग असल्यासारखी काळजी घेत आहे़ दर सहा महिन्यांनी सैन्य दलातील अधिकारी घरी येऊन भेट देतात़ आपुलकीने चौकशी करतात़ काही समस्या असतील तर त्या सोडवतात. ही आपुलकी आणि संवेदना खूप महत्वाची आहे, असे वीरपत्नी मंगल लोढे यांनी सांगितले़शब्दांकन : उमेश घेवरीकर