श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील डिंबे धरणातून येडगाव धरणात थेंबभरही पाणी आले नाही. त्यामुळे येडगाव धरणात २२८ एमसीएफटी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकवर अवलंबून आहे. हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
कुकडी प्रकल्पात ४ हजार ४३० एमसीएफटी (१५टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये डिंबे धरणात ३ हजार २०० एमसीएफटी (२६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र हे पाणी नगर व सोलापुरकरांना डोळ्यांनी पाहण्याची वेळ आली आहे. डिंबे धरणातून येडगावमध्ये आतापर्यत किमान ७०० एमसीएफटी पाणी येणे अपेक्षित होते. पण हे पाणी पुणे जिल्ह्यात मुरले आहे. त्यामुळे येडगावमधून सुटणारे आवर्तन लांबणीवर पडले आहे.
आता माणिकडोह धरणात ७०० एमसीएफटी (७ टक्के) पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे माणिकडोहचे येडगाव धरणात पाणी येणार नाही. पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकवर सारी फिस्त अवलंबून राहणार आहे. नगर, सोलापूरला पाणी सोडायचे म्हटले की, कालवा सल्लागार समितीची बैठक लागते. पुणेकरांचे बंधारे भरण्यासाठी केव्हाही दरवाजे वर होतात. हा दुजाभाव केव्हा संपणार? हाच खरा प्रश्न आहे. घोड धरणात शून्य टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे घोड लाभक्षेत्रातील शेतकºयांना आता पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सीना धरणाची घागर रिकामी पडली आहे. विसापूर तलावात १९६ एमसीएफटी (२१ टक्के) पाणी शिल्लक आहे. पण हे पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.