संगमनेर : महाजनादेश यात्रेनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर थेट टीका टाळली. त्याऊलट राधाकृष्ण विखे यांनी मात्र आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे थोरातांवर टीकास्त्र सोडले. गत पाच वर्षाच्या कालखंडात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी प्रथमच संगमनेरला आले होते. या मतदारसंघातही भाजपची तयारी सुरु असल्याने मुख्यमंत्री काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, फडणवीस यांनी थोरातांवर थेट टीकास्त्र सोडले नाही. ‘मी संगमनेरात आज आलो आहे. विधानसभेवर भगवा फडकावून पुन्हा संगमनेरात येईल’, असे ते म्हणाले. संगमनेरात परिवर्तनाची झलक दिसते आहे एवढाच उल्लेख त्यांनी केला. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली जाणता राजा मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीवेळी नगर उत्तरमधून कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे व शिवसेनेत प्रवेश केलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची देखील याच मैदानावर सभा झाली होती. नगर जिल्ह्यातील सर्व सभांपैकी मुख्यमंत्र्यांची संगमनेरातील सभा महत्वाची होती. कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांच्या मतदारसंघात ते काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. संगमनेरात नव्याने झालेल्या न्यायालयाच्या इमारतीसाठी दिलेला वाढीव निधी व त्याचे थोरातांनी घेतलेले श्रेय एवढाच उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. टीका करताना त्यांनी थोरातांचे नाव घेणे टाळले. या सभेत विखे पिता-पुत्र हे दोघेही कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरुद्ध आक्रमक झालेले पहायला मिळाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी एका वार्तालापात थोरात यांचे कौतुक केले होते. भाजप प्रदेशाध्यक्षांनी कट्टर विरोधक असलेल्या कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षांबाबत केलेले कौतुकाचे वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचावणारे होते. महाजनादेश यात्रेतही फडणवीसांनी थोरातांना थेट लक्ष्य केले नाही. विखे-थोरात यांचे राजकीय वैर आहे. विखे हे थोरात यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. दुसरीकडे भाजपचे नेते मात्र थोरात यांना थेट लक्ष्य करताना दिसत नाहीत. या परस्परविरोधाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचे मौन, विखेंची थोरातांवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:18 AM