कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली आहे. ५ एप्रिलपासून जिल्ह्यात दारू विक्रीस बंदी करण्यात आली होती. शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क अधीक्षकांनी मंगळवारी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात आता घरपोच दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. परमिट रूम, वाइन शॉप्स व देशी दारू दुकानातून मागणीनुसार घरपोच दारू विक्री करता येणार आहे. परवानाधारक विक्रेत्यांना दुकान उघडून दारू विक्री करता येणार नाही, केवळ फोनवर मागणी नोंदवून घरपोच दारू नेऊन द्यावी लागणार आहे. परवानाधारक विक्रेत्यांकडे नोकरनामा असलेल्या कर्मचाऱ्यांमार्फतच ही घरपोच दारू विक्री करता येणार आहे.
दारूसोबत एक दिवसाचा
परवानाही द्यावा लागणार
दारू पिण्यासाठी परवाना आवश्यक असतो. परवानाधारक विक्रेते ग्राहकांना दारू पिण्यासाठी एक दिवसाचा परवाना देऊ शकतात. आता घरपोच दारू विक्री करताना विक्रेत्यांना संबंधित ग्राहकाला एक दिवसाचा परवाना द्यावा लागणार आहे. विदेशी दारूसाठी पाच रुपये तर देशी दारू पिण्यासाठी दोन रुपयांचे शुल्क भरून हा परवाना घ्यावा लागतो.
.........
शासन निर्णयानुसार घरपोच दारू विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. ही विक्री करताना परवानाधारक विक्रेत्यांनी शासनाने घालून दिलेले नियम पाळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कुणीही नियमांचे उल्लंघन करून विक्री केली तर त्यांच्यावर उत्पादन शुल्क विभागामार्फत कडक कारवाई केली जाणार आहे. घरपोच दारू विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निगराणी राहणार आहे.
-संजय सराफ, उपअधीक्षक उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर