मच्छिंद्र देशमुखकोतूळ : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात गावातील निसर्गपूजक संत रामदास बाबांच्या १५० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गावातील नऊशे घरांत बाबांची प्रतिमा असलेली चांदीची नाणी वाटली. तर गावाने चार लाख रूपयांचा मसाला वापरून ११ हजार लिटर आमटी बनवली. नऊशे घरांतून सरासरी दोनशे चपात्या घेऊन दीड लाख चपात्यांचा महाप्रसाद केला.अकोले तालुक्याच्या दक्षिणेला बेलापूर बदगी गावात गेली १५० वर्षे अन्नदानाची एक अनोखी परंपरा सुरू आहे. दीडशे वर्षांपूर्वी बेलापूर गावात कच नदीच्या काठावर योगी रामदासबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. ते ध्यान धारणा, गोपालन, वृक्षसंवर्धन करत. उतारवयात त्यांनी गावात संजीवन समाधी घेतली. समाधीपूर्वी स्वत:च्या गायी विकल्या. त्यातून आलेले तत्कालिन चांदीचे रुपया प्रत्येक उंबरठ्यावर एक याप्रमाणे दिले. त्यातून दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीला आमटी चपातीचा महाप्रसाद करण्याचे सांगितले. आज गावात कुटुंब संख्या वाढली. तरी दीडशे वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.सध्या गावात नऊशे कुटुंब आहेत. ज्येष्ठ द्वादशीला दरवर्षी हा चपाती आमटीचा महाप्रसाद होतो. प्रत्येक कुटुंब कमीत कमी एक पायलीभर गव्हाच्या चपात्या महाप्रसादासाठी देते. तर काही कुटुंब दुप्पट, तिप्पट देतात. लोकवर्गणीतून आमटी तयार होते. या कार्यक्रमासाठी लेकीबाळी, पाहुणे, बाहेरगावी नोकरी, व्यावसायास असलेले, आसपास गावातील लोक जमतात. न चुकता येथे येतात. या पाच दिवसांचे काळात मोठी गर्दी होत असल्याने गृहोपयोगी वस्तू, मिठाई, खेळणी यांची दुकाने मोठ्या संख्येने असतात.यंदा या सोहळ्यात चार लाख रूपयांचा मसाला वापरला. सहाशे किलो शेंगदाणा तेल वापरून ११ हजार लिटर आमटी केली. तर नऊशे घरातून किमान दीड लाख चपाती आली. प्रत्येक पाहुण्याला, भाविकांना आग्रहाने जेवणासाठी अमंत्रित केले होते. यंदा रामदासबाबांच्या १५० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गावाने लोकवर्गणीतून रामदासबाबांची प्रतिमा असलेली नऊशे चांदीची नाणी दिली.मी गेली ४६ वर्षे आमटी बनविण्याचे काम करतो. मी शासकीय नोकरीत असलो तरी काम बाजूला ठेवून निस्वार्थपणे हे काम करतो. दरवर्षी दोन तीनशे लिटर आमटी वाढवावी लागते. भाविकांची संख्या वाढत आहे. आमटी, चपाती सोडून दुसरा पदार्थ इथे नसतो. द्वादशी, त्रयोदशीला हा महाप्रसाद असतो. -किसन गणपत फापाळे, बेलापूर, आमटीचे आचारी.
अख्या बेलापूर बदगी गावात वाटली चांदीची नाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 3:58 PM