अहमदनगर : शहरातून जाणाऱ्या सीना नदीपात्राची स्वच्छता महापालिकेने हाती घेतली आहे. ही सफाई करताना पात्रातून काढलेला गाळ कडेलाच टाकला जात आहे. मोठा पाऊस झाल्यानंतर हा गाळ पुन्हा पात्रात येऊन अडकणार आहे. वर्षानुवर्षे अशा पद्धतीने ओढे व नाले सफाई होत असल्याने महापालिकेचे दरवर्षी लाखो रुपये गाळात जात आहे.
महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घेतली आहे. शहरातील ओढ्या-नाल्यांतील गाळ काढून स्वच्छता केली जात आहे. स्वच्छता करताना निघालेला पात्रापासून दुसरीकडे वाहून नेणे अपेक्षित आहेत. हा गाळ दुसरीकडे टाकल्यास कितीही पाऊस झाला, नदी व नाले भरणार नाहीत. मात्र, महापालिकेच्या बांधकाम विभागाने फक्त नाले साफ करण्याचेच काम ठेकेदाराला दिले गेले आहे. त्यामुळे नालेसफाई करण्याच्या नावाखाली केवळ प्रवाह मोकळे करण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू आहे. यावर स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी अक्षेप घेतला. सभागृह नेते रवींद्र बारस्कर व नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी तक्रारी केली. नदीपात्रातील गाळ काढून तिथेच बाजूला टाकला जाणार असेल तर पाऊस पडल्यानंतर तो पुन्हा नाल्यात येईल, असे त्यांचे म्हणणे होते. नगरसेवकांच्या तक्रारीनंतरही कामात सुधारणा झाली नाही. सध्या काटवन खंडोबा येथे सीना नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. पात्रातील गाळ काढून तो तिथेच जागेवर टाकला जात आहे. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यानंतर हाच गाळ पुन्हा पात्रात येईल.
......
नालेसफाईचा गाळ जागेवरच
नदी व नाल्यांची स्वच्छता करून गाळ तिथे कडेला टाकून दिला जातो. नालेसफाई जेसीबीच्या साहाय्याने केली जात असून, या मशीनद्वारे गाळ तिथेच कडेला रिचला जातो. पाऊस पडल्यानंतर हा पाण्यासोबत घसरून पात्रात येतो. परिणामी मोठा पाऊस पडून गेल्यानंतर नदी व नाले पुन्हा गाळाने भरतात. यावर ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.