योगेश गुंड ।
केडगाव : शाळेतील मुलांच्या दप्तराचे वाढते ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सहा पुस्तकांची तीनच पुस्तके केली आहेत. एका पुस्तकाचे तीन भाग करून ते वर्षभर तीन महिन्यांच्या अंतराने शिकविले जाणार आहेत. एकात्मक पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत नगर शहर व श्रीरामपूर शहरात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जात आहे.
शालेय स्तरावरील शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक विषयाचे पाठयपुस्तक, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपासपेटी यासारखे साहित्य दप्तरामध्ये घेऊन जावे लागते. प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणाºया मुलांमध्ये पाठदुखी, मानदुखी, डोकेदुखी, मानसिक ताण असे अनेक विकार निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पालक, शिक्षणतज्ज्ञ व डॉक्टर यांची अनेक दिवसांपासून मागणी होती.
शालेय शिक्षण विभाग व राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ यांनी यंदापासून इयत्ता पहिली ते सातवीच्या मराठी माध्यमांच्या वर्गासाठी एकूण सहा पुस्तकांचे तीन पुस्तकात रूपांतर केले आहे. या पुस्तकांचे तीन भाग तयार करण्यात आल्याने मुलांना वेळापत्रकानुसार हे भाग स्वतंत्रपणे शाळेत नेता येणार आहेत. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
राज्यस्तरावर २०१३ मध्ये याबाबत समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला दिला. त्यात पुस्तकांचे एकत्रिकरण करण्याची शिफारस होती. पुण्यात हा प्रयोग यशस्वी झाल्याने राज्यात हा प्रयोग राबवला जाणार आहे. यामुळे दप्तराचे ओझे कमी होईल.
-दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण विभाग
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग नगर शहर व श्रीरामपूर शहरात राबवला जात आहे. नगर शहरातील ७५ टक्के मुलांना पुस्तके वितरीत करण्यात आले आहेत. फक्त भिंगार शहर राहिले आहे. -सुभाष पवार, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ, नगर