अहमदनगर: कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून सोनाराचा खून करणाऱ्या पपड्या गँगमधील चौघांसह चोरीचे सोने विकत घेणा-या दोघा सराफांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. दरोडेखोरांना वर्धा, जालना तर सराफांना बोरगाव (जि़ औरंगाबाद) येथून गुरूवारी ताब्यात घेतले. पवन सागर पवार उर्फ पवन तुकाराम चव्हाण उर्फ पवन पपड्या काळे (वय १९) शुभम सागर पवार उर्फ शुभम तुकाराम चव्हाण उर्फ शुभम पपड्या काळे (वय २० रा. कार्ला चौक, सुदर्शननगर, वर्धा), किशोर कांतीलाल भोसले (वय २२ रा. हासनाबाद ता. भोकरदन जि. जालना), अक्षय सुरेश बिरारे (वय २२ रा. बोरगाव ता. बलंब्री जि. औरंगाबाद) या दरोडेखोरांसह चोरीचे सोने विकत घेणारे राहुल अशोक बिरारे (वय २८ रा. फुलंब्री) व अनिल शिवाजी बाबर (वय ४० रा. औरंगाबाद) अशी ताब्यात घेतेल्यांची नावे असून, यातील पवन व शुभम हे कुख्यात दरोडेखोर पपड्या काळे याची मुले आहेत. गुन्हा केल्यानंतर दरोडेखोरांना सोनारांना विकलेले १ किलो ३०० गॅ्रम सोने व २ किलो ८४० ग्रॅम चांदी पोलीसांनी हस्तगत केली आहे. पपड्या काळे व त्याच्या २० ते २५ साथीदारांनी १९ आॅगस्ट रोजी कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकून दुकानाचे मालक गणेश घाडगे व शाम घाडगे यांच्यावर गोळीबार केला. यात शाम यांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश हे गंभीर जखमी झाले़ या गुन्ह्यातील ९ जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ५ सप्टेंबर रोजी नगरसह औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून अटक केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिलीप पवार सहाय्यक निरिक्षक रोहन खंडागळे, ज्ञानेश फडतरे, गणेश इंगळे, सचिन खामगळ, सहाय्यक फौजदार नानेकर, कॉस्टेबल सुनील चव्हाण, योगेस गोसावी, मल्लीकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, संतोष लोढे, भागीनाथ पंचमुखी, रविंद्र कर्डिले,रवी सोनटक्के, विशाल दळवी, अण्णा पवार, योगेश सातपुते, मनोज गोसावी, सचिन अडबल आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.