भिंगार : शहरातून जाणारे राज्य व राष्ट्रीय महामार्ग,वाढती वाहतूक, रहदारीने स्टेट बँक आणि चांदणी चौकात नऊ जण अपघातात बळी गेले आहे. वेगवेगळ्या २४ अपघातात १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्यापही अपघाताची मालिका सुरूच आहे. अपघातात मृत पावणाऱ्यापैकी काही जणांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत.बाह्यवळणाचे रखडलेले काम, बाह्यवळणाची दुरवस्था, शहरातून सर्रास होणारी अवजड वाहतूक, नियंत्रणबाह्य वेगमर्यादा, चौका चौकात वाढलेले अतिक्रमण, उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे याचा परिणाम अपघातातील बळींची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. सोलापूरकडे येणारी व जाणारी अनेक वाहने चांदणी चौकातून वळण घेऊन पुढे जात आहेत. सोलापूरकडे जाणाऱ्या स्त्यावर रस्ता दुभाजक नसल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते आहे. त्यात भर पडते आहे ती अतिक्रमण धारकांची व बेशिस्त अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची! परिणामी नऊ नागरिकांना स्वत:चा जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये निम्याहून अधिक तीस वर्षाखालील व्यक्ती आहेत. त्यांच्यावर संसाराचा गाडा चालत होता, त्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत.शुक्रवारी भातोडी पारगावमधील प्रवीण अर्जुन उमाप (वय २७)या युवकाचा रस्त्याने पायी चालत असतांना अपघातात मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. प्रवीण ट्रक चालक होता. त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहचे काय? असा यक्ष प्रश्न त्याचेच नातेवाईक करीत आहेत. (वार्ताहर)चौकातील सिग्नल सुरू करण्यासाठी महापालिकेला पत्र दिले आहे. सिग्नल सुरू झाल्यानंतर वाहतुकीचे नियमन करण्यास मदत होईल. नागरिकांनी नियम पाळावेत.-ज्ञानेश्वर ढोकले,पोलीस निरीक्षक
चांदणी चौकाने घेतले एक वर्षात सहा बळी
By admin | Published: August 09, 2014 11:15 PM