अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागातले रणांगण तापले असून, मंगळवारी तब्बल ६ हजार ४०० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. दत्त जयंतीचा मुहुर्त साधून अनेकांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. चार दिवसांमध्ये ८ हजार ४५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणखी गर्दी होणार आहे.
मंगळवारी दाखल झालेले अर्ज (कंसात आतापर्यंत दाखल झालेेले अर्ज) : अकोले -३१२ (३९४), संगमनेर-२९५ (३७६),कोपरगाव-४०० (४५७), श्रीरामपूर -३२५ (४२८), राहाता-२५८ (३१३), राहुरी -३२८ (३९९), नेवासा-५३४ (७३८), नगर-६३९ (७८१),पारनेर-७३९ (५५७), पाथर्डी -६२५ (७६२), शेवगाव -४५५ (६१३), कर्जत-४८९ (६२०),जामखेड-४४२ (५७८), श्रीगोंदा -५९२ (७३०). एकूण-६४३३ (८०४६). गेल्या चार दिवसांमध्ये सर्वाधिक अर्ज मंगळवारी दाखल झाले.
जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीमध्ये ७ हजार १३४ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. आतापर्यंत ८ हजार अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी बुधवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच तहसील कार्यालयात झुंबड उडण्याची शक्यता आहे.