शेवगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही तालुक्यातील सहा गावांनी कोरोनाला शिवेवरच रोखले. तालुक्यातील ११३ पैकी १०७ गावांना कोरोना संसर्गाने विळखा घातला होता. त्यातील पंधरा गावे कोरोनामुक्त झाली आहेत. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील बाधितांच्या संख्येत घट होत आहे.
दुसऱ्या लाटेत कोरोनाने तालुक्यात अक्षरशः थैमान घातले. फेब्रुवारी ते २२ मे या कालावधीत शहरासह तालुक्यातील ७ हजार ४७० नागरिक कोरोना बाधित झाले. त्यातील ११४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. ६ हजार १९५ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या १ हजार २७५ रुग्णांवर, विविध हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान काही गावातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्याने संबंधित गावातील बाधित रुग्ण संख्येत घट होताना दिसून येत आहे. तालुका प्रशासनाने रुग्ण संख्या वाढत असलेल्या गावात तळ ठोकून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे वाढत्या रुग्ण संख्येला आळा बसला.
दरम्यान, ब्रेक द चेन काळातील नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. गत चार दिवसात रस्त्यावर फिरणाऱ्या ७४० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
--------
ही गाव झाली कोरोनामुक्त.
दादेगाव, मुर्शतपूर, बऱ्हाणपूर, सुलतानपूर, शहाजापूर, बेलगाव, चेडेचांदगाव, खामपिंप्री जुनी, पिंगेवाडी, दिवटे, कोनोशी, जोहारापूर, लोळेगाव, विजयपूर.
----------
या गावांनी रोखला कोरोना
लाखेफळ, मालकापूर, शहापूर, घेवरी, देवळाणे, ढोरहिंगण या गावाने कोरोनाला शिवेवरच रोखले.
-------
रस्त्यावर फिरणाऱ्यांची या दिवशी केली चाचणी..
दिनांक चाचणी संख्या सापडलेले पॉझिटिव्ह.
१७ मे ११५ ४
१८ मे १९८ १
१९ मे २०० ५
२० मे २२७ ७