विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीची भिंत रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्याने कोसळल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तीन मजूर किरकोळ जखमी झाले. बांधकाम झालेल्या सर्व भिंती वादळाने कोसळल्या.
आरव भाऊसाहेब इंगावले (वय ६) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
कोरेगाव येथे साकळाई वस्तीवर गोरख ताण्याबा इंगावले यांच्या घराचे बांधकाम चालू आहे. त्या ठिकाणी मजूर सिंगल विटांचे बांधकाम करत होते. रविवारी साडेचारच्या सुमारास जोराचा वारा सुटल्याने दहा फूट उंचीच्या चारही बाजूंच्या भिंती कोसळल्याने तीन मजूर किरकोळ जखमी झाले. त्या ठिकाणी आरव भाऊसाहेब इंगावले (वय ६ वर्षे) हा मुलगा खेळत असताना वारा व पाऊस आल्याने भिंतीच्या आडोशाला उभा राहिला होता. त्याच्या अंगावर भिंत कोसळल्याने विटांच्या ढिगाऱ्या खाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा मुलगा कोठे गेला, याची शोधाशोध काही वेळानंतर सुरू झाली. तो विटांच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. या ठिकाणी वाऱ्यामुळे एक मोठे बाभळीचे झाडही कोसळले. पोलीसपाटील बाळासाहेब लंके यांनी बेलवंडी पोलिसांना माहिती दिली.
---
३० कोरेगाव
कोरेगाव येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वादळाने पडलेल्या भिंती.