सिद्धटेक : भीमा नदीस आलेल्या महापूरामुळे अहमदनगर-पुणे जिल्ह्यास जोडणारा सिद्धटेक (ता. कर्जत) पुलाचा स्लॅब उखडला आहे. या पुलाची कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी केली. काम पूर्ण करण्यासाठी वीस ते पंचवीस दिवस लागतील. फक्त पादचारी मार्ग ठेवण्यात येणार आहे.अहमदनगर-पुणे जिल्हा जोडणारा दौंड-उस्मानाबाद राज्य मार्ग ६७ वरील हा पूल पंधरा वर्षी पूर्वी झाला आहे. बुधवारी महापूर ओसरल्यानंतर पुलाच्या स्लॅबचा वरील चार इंची भाग मध्यभागी तुटला आहे. खाली मुख्य अठरा इंची पायाभूत स्लॅब व्यवस्थित दिसत आहे . प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूने वाहतूक बंद केली आहे. फक्त पादचारी मार्ग चालू ठेवला आहे. अष्टविनायकापैकी एक सिद्धटेक येथील सिद्धीविनायक गणपतीला पुणे, मुंबईकडील मोठ्या प्रमाणात भाविक या पुलावरूनच येतात. तसेच शाळकरी मुले, रूग्ण, दूध ,भाजीपाला, फळे यांची याच मार्गे ये-जा होते. या पुलामुळे फक्त दोन जिल्हेच नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याशी जोडला जात आहे. पुलाच्या दुरुस्तीचे गांभीर्य लक्षात घेवून युद्धपातळीवर काम करून दहा ते बारा दिवसांमध्ये एकेरी वाहतूक सुरू करणे अपेक्षीत आहे. उजनी धरण शंभर टक्के भरले असून भीमा खोऱ्यातून येणारा पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने पूर ओसरला आहे. नगर-दौंड रस्त्यावरील पुलाजवळून ८७ हजार क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाचे काम बारा ते पंधरा दिवसात पूर्ण करावे. त्यासाठी एवढे दिवस कशासाठी? एका बाजूने प्रथम काम करून वाहतूक सुरू करावी. -साधना कदम, सभापती, पंचायत समिती, कर्जतपुलाचा चार इंची थर काढून नविन कॉँक्रिटचा थर दिला जाईल. वीस ते पंचवीस दिवसांमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाईल. -सुरेश राऊत, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम
स्लॅब उखडला : सिद्धटेकचा पूल २५ दिवसांनी होणार खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 6:06 PM