अहमदनगर : यंदा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत १६ टक्के घट नोंदवली गेली. मात्र सप्टेंबरअखेर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत काहीशी वाढ झाल्याचे दिसते आहे. मात्र ही वाढ आभासी असून पुढील काही महिन्यात पाऊस न झाल्यास जानेवारीपासून पाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तवला आहे.
यंदा पावसाळाच्या प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांच्या उत्पन्नात मोठी घट नोंदवली गेली. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ४४८ मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधीत ४०० मीमी एवढा म्हणजे १६ टक्के कमी पाऊस पडला. सरासरी पर्जन्यमानात घट आढळली असली तरी सप्टेंबरअखेर झालेल्या पावसामुळे निरीक्षण विहिरींतील पाण्याच्या पातळीत मात्र वाढ झालेली दिसते आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या भूजल पातळी निर्देशांक अहवालानुसार जिल्ह्यातील तालुकानिहाय २०२ निरीक्षण विहिरींच्या सप्टेंबरमधील भूजल पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यात जिल्ह्यात मागील पाच वर्षांतील सप्टेंबर महिन्याच्या पाणी पातळीच्या तुलनेत २०२३ च्या पाण्याच्या पातळीत केवळ अकोले तालुका वगळता इतर तालुक्यांत ० ते १ मीटरपर्यंत वाढ दिसून आली आहे.
मात्र ही वाढ सप्टेंबरअखेरच्या पावसाची आहे. त्यामुळे पुढील काळात पाऊस झाला नाही तर जानेवारी २०२४ पासून जिल्ह्यात टंचाईची स्थिती सुरू होऊन उन्हाळ्यात ती तीव्र होणार आहे. त्यामुळे बहुतांश तालुक्यात टँकर सुरू करावे लागणार आहेत, असाही भूजल सर्वेक्षण विभागाचा अंदाज आहे.
जामखेड, पारनेरला १ ते २ मीटर वाढ सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत सप्टेंबर २०२३ अखेरच्या स्थिर पाणी पातळीत केवळ अकोले तालुक्यात ०.५ मिमी घट झाली आहे. दुसरीकडे कर्जत, कोपरगाव, नगर, नेवासा, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर या तालुक्यांत ० ते १ मीटरपर्यंत वाढ झालेली आहे. जामखेड व पारनेर तालुक्यात हीच वाढ १ ते २ मीटरपर्यंत आहे.
पुढील दोन महिन्यांत अवकाळी पाऊस झाल्यास भूजल पातळीत आणखी वाढ होऊ शकते; अन्यथा परिसरात जानेवारीपासून पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका रब्बी पिकांना बसण्यासह पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवू शकते. प्रामुख्याने संगमनेर, पाथर्डी, पारनेर अशा तालुक्यांत टँकर सुरू होणार आहेत. सध्या येथे काही टँकर सुरू आहेत.
सप्टेंबरअखेर झालेल्या पावसामुळे भूजल पातळीत सध्या तरी वाढ दिसत आहे. मात्र ही आभासी वाढ आहे. पुढे पाऊस न झाल्यास जानेवारीपासून टंचाई जाणवू लागेल. उन्हाळ्यात ती आणखी तीव्र होईल.- अजिंक्य काटकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा