राहाता : राहाता नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीतून एका मनोगोरुग्णास कचरा डेपोत सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.१०) घडला होता. या घटनेच्या निषेधार्थ स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश मालखरे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी राहाता नगरपालिकेसमोर सोमवारी रात्री उशीरा धरणे आंदोलन केले.राहाता नगरपालिकेचा घनकचरा वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीतून नेऊन एका मनोरुग्ण व्यक्तीला कचरा डेपोत सोडल्याचा प्रकार समाज माध्यमाद्वारे व्हायरल झाला होता. त्यानंतर सोमवारी राहाता येथे स्माईल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भेट देवून घटनेची चौकशी केली. मुख्याधिकारी बारींद्रकुमार गावीत यांच्याशी त्यांनी संपर्क साधला असता ते बाहेर गावी असल्यामुळे येवू शकत नसल्याचे मुख्याधिका-यांनी सांगितले.घटना घडून दोन दिवस होवूनही पालिका प्रशासनाने संबंधित कर्मचा-याविरुद्ध कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश मालखरे व त्यांच्या सहका-यांनी पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. मुख्याधिकारी संबंधित कर्मचा-यांना निलंबीत करत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार मालखरे यांनी व्यक्त केला. धरणे आंदोलनात सुमन ठाकरे, गणेश चावरे, कोमल गोर्डे, योगेश सोनवणे, महेश बागडे, विशाल चव्हाण, सागर मुळे, अमित भिंगारदिवे, राहुल घंगाळे, संतोष तावरे, कार्तिक त्रिंबके, हृतिक त्रिंबके आदींसह त्यांचे कार्यकर्ते सहभागी आहे. राहाता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, सागर लुटे, सचिन गाडेकर, बाळासाहेब गिधाड, दशरथ तुपे, किरण वाबळे, राज लांडगे यांनी या धरणे आंदोलनास पाठींबा दिला.
हा प्रकार दुर्दैवी आहे. दुस-या दिवशी रविवारची सुट्टी होती. सोमवारी (दि.१२) संबंधीत कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीसा काढल्या आहेत. त्यांचे म्हणणे आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. घटलेली घटना निंदनीय असून ती समर्थनिय नाही. कर्मचारी दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.-बारींद्रकुमार गावीत, मुख्याधिकारी