कोपरगाव (जि. अहमदनगर) : गेली दोन दिवस कोपरगाव शहराच्या भर वस्तीत धुमाकूळ घालणारा मादी बिबट्या मंगळवारी पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर कोपरगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सोमवार दि.१६ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास बैल बाजार रोडवर बिबट्याचे दर्शन झाले. याचवेळी तो सुभाष नगर परिसरात गेला. तिथे एका तरुणावर हल्ला केला होता. त्यानंतर सोमवारी रात्री बिबट्याने बस स्थानकात एन्ट्री केली. वनविभागाचे कर्मचारी, पोलीस बस स्थानकात दाखल झाले.
जाळ्यांच्या साह्याने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हुलकावणी देत बिबट्याने बस स्थानकाची संरक्षण भिंत ओलांडून धारणगाव रस्त्याने संभाजी महाराज चौकाकडे चालत जात होता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
चित्रीकरणासाठी आपला जीव धोक्यात घालून अनेक जण त्याच्या सोबत चालत होते. त्यानंतर बिबट्या गायब झाला तो मंगळवारी दुपारी भरवस्तीत बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या एचडीएफसी बँके शेजारी असलेल्या रिकाम्या जागेत दिसला. त्यानंतर संगमनेर येथील वन विभागाच्या शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले.
स्थानिक पोलीस व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाच तास रेस्क्यू ऑपरेशन राबविले त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास मादी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. यावेळी आमदार आशुतोष काळे तहसीलदार संदीपकुमार भोसले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख उपस्थित होते.
नैसर्गिक अधिवासात सोडणारमादी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले, त्यात वनविभागाचे १५ कर्मचारी, शहर पोलिस यांचा सहभाग होता. जेरबंद करण्यात आलेल्या मादी बिबट्याला काही दिवस निगराणी खाली ठेवून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.-प्रतिभा पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी