श्रीगोंदा : केंद्र शासनाने परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्याचे धोरण घेतले आहे. त्यामुळे भविष्यात ठेवी व कर्जावरील व्याज दरात घसरण होणार आहे. त्यामुळे पतसंस्थांनी जादा व्याज दराने ठेवी घेण्याच्या मोहात पडू नये आणि ठेवीदारांनी प्रमाणापेक्षा जादा व्याजदराने पैशाची गुंतवणूक करू नये. यातून ठेवीचे पैसे बुडण्याची भीती आहे, असे मत श्रीगोंद्याचे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडेकर यांनी व्यक्त केले.
बेलवंडी (ता.श्रीगोंदा) येथील व्यापाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेने आयोजित सहकारी संस्था सभासद प्रशिक्षण चर्चासत्रात ते बोलत होते .
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार होते.
खेडेकर म्हणाले, बेलवंडी व्यापाऱ्यांची सहकारी पतसंस्थेची स्थापना १८ वर्षापूर्वी झाली. २५ कोटींच्या ठेवीवर २० कोटी कर्ज वितरण केले. कोणत्याही संस्थेने जादा शाखा काढण्याच्या फंद्यात पडू नये. जादा शाखा काढल्या की मॅनेजमेंट होत नाही. त्यामुळे संस्था अडचणीत येते. याचा फटका मोठमोठ्या बॅकांनाही बसला आहे.
शेलार म्हणाले, बेलवंडी व्यापाऱ्यांची सहकारी पतसंस्थेने राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून कारभार केला. त्यामुळे संस्थेची प्रगती झाली आहे.
यावेळी हास्यसम्राट अशोक देशमुख यांनी ‘ताण, तणाव कमी कसा करावा’ या विषयावर मार्गदर्शन केले. सभासदांना विमा चेक वाटप करण्यात आले. अग्नीपंख फाउंडेशनला पाच हजाराची मदत करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक अरविंद माने, सुनील साखरे, बाळासाहेब बडदे यांची भाषणे झाली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराटे, सुभाष काळाणे, उत्तमराव डाके, केशव कातोरे, युवराज पवार, मुख्याध्यापक पवार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सोपानराव हिरवे यांनी केले. सचिव किसनराव वऱ्हाडे यांनी आभार मानले.