अहमदनगर - भाजपा नेते आणि खासदार सुजय विखे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. विशेष म्हणजे विरोधकांच्या आरोपाचे खंडन करताना सुजय विखेंनी तर मी राजीनामा देईन, असे आव्हानच विरोधकांना दिलंय. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये सुजय विखेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. सुजय विखे आपल्या भाषणशैली आणि रोखठोक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. यापूर्वी पुढील 20 वर्षे मीच खासदार असणार, असे त्यांनी म्हटले होते. त्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.
गेली दोन वर्षे हा साखर कारखाना चालवत असताना कुणी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिल्यास आपण संचालक पदासह खासदारकीचा देखील राजीनामा देऊ. राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासाने साखर कारखाना आमच्याकडे दिला आहे, असे सुजय यांनी म्हटले. तसेच, माझे अंदाज खरे ठरतात. मी केंद्रात मंत्री झालो तर आश्चर्य वाटू देऊ नका, असेही ते म्हणाले. त्यानंतर, सुजय यांची केंद्रात मंत्रीमंडळपदी वर्णी लागेल का? अशी चर्चाच सभेत सुरू झाली. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या 64 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. दरम्यान, डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये भाजपचे खासदार सुजय विखे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.