केडगाव : येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे असलेली थकबाकी ३१ मार्चपर्यंत न भरल्यास महावितरण कंपनीचे कार्यालय ‘सील’ करण्याचा निर्णय आज सोमवार (दि. २२) रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला.
जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे ग्रामपंचायतीची पाणीपट्टी व कर मिळून १ लाख ३७ हजार रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी सहा वर्षांपासून असल्याकारणाने ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये मार्चअखेरीस थकबाकी जमा न झाल्यास जेऊर येथील महावितरण कंपनीचे कार्यालय सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील आठवड्यात महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीकडे असलेल्या वीज बिलाच्या थकबाकीसाठी ग्रामपंचायतीचे वीजजोड तोडले होते. वीजजोड तोडण्यात आल्याने ग्रामपंचायत सदस्यही आक्रमक होत महावितरण कंपनीला थकबाकी भरण्याबाबत नोटीस काढली आहे. नोटीसमध्ये थकबाकी जमा न केल्यास कार्यालय सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महावितरण कंपनीने मार्च महिन्यात थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी अनेक ठिकाणी रोहित्र बंद करून शेतकऱ्यांकडून वीजबिलाची वसुली केली होती. नगर तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी योजनेचे वीज जोड तोडून योजनाही बंद केली होती. मात्र, ग्रामपंचायतीची थकबाकी महावितरण कंपनीकडून भरण्यात येत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
---
ग्रामपंचायतीकडे असलेल्या वीज बिलाची वजावट करून उर्वरित ग्रामपंचायतीचा कर व पाणीपट्टी महावितरण कंपनीकडून नियमितपणे भरण्यात येणार आहे.
-किसन कोपनर,
उपकार्यकारी अभियंता, महावितरण