प्रकाश महालेराजूर : अकोले तालुक्यातील राजूरमध्ये गेल्या पाच दशकाहून अधिक काळापासून सामाजिक एकोपा जपला जात आहे. हिंदू आणि मुस्लिम सलोख्याने एकमेकांचे सण मोठ्या आनंदात साजरे करतात. हिंदूचा गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असू दे की मुस्लिमांचा मोहरम, ईद किंवा उरूस या सर्वच उत्सवातून राजूर येथील राम रहीम तरुण मित्र मंडळ ऐक्य जपत आहे.राजूर येथे विविध जाती धर्माचे लोक राहतात. स्थानिकांबरोबर नोकरी निमित्ताने रहिवासी झालेल्यांची संख्याही आता अधिक झाली आहे. सर्वच धर्माचे लोक आपले सण उत्सव आपापल्या परीने साजरे करतात. खाटीक गल्लीतील राम रहीम तरुण मित्र मंडळाने आपली आगळी वेगळी परंपरा अद्यापही सुरूच ठेवली आहे. हिंदूंचा गणेशोत्सव असो की मुस्लिमांचा उरूस यावेळी निघणाºया मंडळाच्या मिरवणूक रथावर भगव्या बरोबर हिरवा झेंडाही फडकत असतो. आजही गणेशमूर्तीची स्थापना केलेल्या हॉलच्या दरवाज्यावर हे दोन्ही झेंडे फडकत आहेत. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळात जेवढी संख्या हिंदू तरुणांची तेव्हढीच मुस्लिम समाजाची.गणेशोत्सवासाठी या गल्लीतील मुस्लिम समाज तर उरुसच्या संदल मिरवणुकीसाठी गल्लीतील हिंदू समाज बांधव स्वइच्छेने ठरणारी वर्गणी वा देणगी देण्यात मागे हटत नाहीत. दोन्ही वेळच्या आरतीस सर्वच एकत्र येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भांगरे व जिशान खाटीक यांनी सांगितले. विकी मुतडक, जावेद खाटीक, सचिन शेंडे, नौशाद खाटीक, स्वप्निल कानकाटे, अंकुश सुकटे व इतर सर्वच मंडळातील तरुणाई उत्स्फूर्तपणे कार्यक्रम पार पाडतात. हम सब एक है चा नारा देतात. पन्नास वर्षांपासून सुरू आहे परंपराआम्ही लहान असतानाही या कार्यक्रमांचा कार्यक्रमांचा आनंद घ्यायचो. त्यामुळे मागील पन्नास वर्षांहून अधिक काळाची परंपरा तरुणाईने पुढेही सुरू ठेवली आहे. त्यामुळे कुठल्याही उत्सवात गल्लीत वाद होत नाहीत व एकोपा टिकून असल्याचे राम रहीम मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय जगदाळे यांनी सांगितले़
राजूरमध्ये जपला जातोय सामाजिक एकोपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 3:44 PM