संगमनेर : सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माउलींनी ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्वे स्वधर्मे सूर्ये पाहो। जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात ।।’ आणि चारशे वर्षांपूर्वी जगद्गुरू तुकोबारायांनी ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ।।’ असा विचार सांगितला. हा विचार म्हणजेच समाजवाद होय. समाजवाद हा शब्द नवीन असेल, पण समाजवादी विचार हा फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, असे ज्येष्ठ शिक्षक नेते हिरालाल पगडाल म्हणाले.
जयहिंद लोकचळवळ आयोजित संदीप खताळ यांच्या स्मृतीनिमित्त संविधान जागर ऑनलाइन व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना ‘लोकशाही व समाजवाद’ या विषयावर पगडाल बोलत होते. पगडाल म्हणाले, जोपर्यंत काही माणसे दुःखी, उपाशी, वंचित, पीडित नाडीत आहेत आणि काही माणसे अवैद्य मार्गाने संपत्ती कमावतात. शोषण, लूट, नफेखोरी, साठेबाजी आणि कर चुकवेगिरी करतात, तोपर्यंत समाजवादी विचार अस्तित्वात राहतील. शोषितांना, वंचितांना, गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे. लोकशाहीत भले अनंत दोष असतील, परंतु लोकशाहीला पर्याय नाही, कारण फक्त लोकशाही व्यवस्थेतच सरकारच्या विरोधात दाद मागण्याचा, आंदोलन, टीका करण्याचा अधिकार जनतेला असतो. तो इतर कोणत्याही शासन व्यवस्थेत नाही.
भारतीय लोकशाही जगातील यशस्वी लोकशाही असून भारतीय नागरिक हे परिपक्व आणि जागृत मतदार आहेत. हे गेल्या सत्तर वर्षांच्या वाटचाली वरून सिद्ध झाले आहे. भारतीय मतदारांनी दर दहा वर्षांनी प्रस्थापित सत्तेला झटका दिलेला आहे. भारतात शांततामय मार्गाने अनेकदा या पक्षांकडून त्या पक्षाकडे सत्तांतर झाले आहे. गेल्या सत्तर वर्षांत अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजा भागवून देशातील दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आपल्याला यश आले आहे. हा लोकशाही समाजवादी विचाराचाच एक भाग आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी संदीप खताळ यांच्या स्मृतीस अभिवादन करून व्याख्यानमाला आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला. ॲड.समीर लामखडे यांनी प्रास्ताविक केले, राजीवकुमार साळवे यांनी आभार मानले. समीर कडलग यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.