संगमनेर : समाजात ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवतात. मग ते कोणतेही क्षेत्र असो, आपणही असेच कोणतेही एखादे आवडीचे क्षेत्र निवडा आणि अक्षरशः वेडे होऊन त्या क्षेत्रात काम करा. असे वेडे होऊन काम करणे आपल्यातील ‘स्व’चा शोध असतो, असे शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी म्हणाले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘संगमनेर हेरिटेज वॉक’ या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शुक्रवारी (दि.२४) ते बोलत होते. संगमनेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनादिनी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना रासेयो स्वयंसेवक, प्राध्यापकांनी भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला. या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष दुर्गा तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य राजेंद्र लड्डा यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
संगमनेर नगर परिषदेपासून सुरू झालेल्या या हेरिटेज वॉकमध्ये डॉ. संतोष खेडलेकर यांनी कवी अनंत फंदी यांचे जन्मस्थळ, संगमनेरच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेले सर डी.एम. पेटीट विद्यालय, संगमनेरची प्राचीन गढी, सप्तशृंगी मंदिर, जुना मोटार अड्डा, अशोक स्तंभ, पंडित नेहरू यांचे सभा स्थान, लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्या संगमनेर भेटीची ठिकाणे आणि त्याचा इतिहास, भवानी बाग आदी सुमारे पंचवीस घटना घडामोडींची माहिती दिली.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी.बी. राठी, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले, कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कदम, डॉ. संदीप कदम, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे सचिव देवीदास गोरे, अशोक गवांदे, शशांक गंधे, शांताराम डोंगरे, डॉ. बाळासाहेब पालवे, सागर श्रीमंदिलकर, डॉ. श्रीनिवास भोंग, डॉ. रोशन भगत, डॉ. सागर भिसे, डॉ. मोहन मोरे, सुरेश भागवत, डॉ. अजित कदम, प्रवीण त्र्यंबके यांनी परिश्रम घेतले.