श्रीगोंदा : टाकळी लोणार (ता. श्रीगोंदा) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव सुभाष निकम यांनी कुटुंबातील सदस्यांच्या नावावर बोगस पीक कर्ज काढले आणि त्यावर शासनाच्या कर्जमाफीचा लाभही मिळविला. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक दिग्विज आहेर यांनी सुभाष निवृत्ती निकम यांना निलंबित केले आहे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, युवराज पळसकर यांनी केलेल्या तक्रारीची सहकार विभागाने दखल घेऊन ही कारवाई केली. सुभाष निकम यांनी पदाचा गैरवापर करून कुटुंबातील सभासद व पत्नीच्या नावे कमी क्षेत्रावर ६० हजार रुपये कर्ज घेतले. तसेच सरस्वती निकम ६० हजार रुपये, क्षेत्र ४ आर., सुवर्णा सुभाष निकम क्षेत्र नसताना ६० हजार कर्ज, सुश्मिता विकास निकम ६० हजार कर्ज, क्षेत्र १७ आर., वैशाली दादा निकम ६० हजार कर्ज, क्षेत्र १६ आर. असे बोगस कर्ज काढले. जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव देविदास घोडेचोर यांनी सुभाष निवृत्ती निकम यांना भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटीत अधिकाराचा दुरुपयोग करून संस्थेचे पोटनियमबाह्य कामकाज केले आहे, असा ठपका ठेवत १० ऑगस्टपासून सेवेतून निलंबित केले.
---
व्याजात गोंधळ अन् कर्जमाफीही मिळविली
निकम यांच्या कुटुंबातील सर्व सभासदांच्या कर्ज खात्याची तपासणी उपलेखापरीक्षक, सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी केली. त्यात निकम यांनी पदाचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले. स्वतःही कर्ज रक्कम १ लाख ६० हजार व त्याचे प्रत्यक्ष होणारे व्याज रक्कम ५६ हजार ४३० रुपये असे एकूण २ लाख १६ हजार ४३० रुपये होतात. मात्र, त्यांनी व संस्थेचे लिपिक संभाजी गोरख गलांडे यांनी संगनमत करून व्याज ३० हजार ८५७ रुपये घेऊन १ लाख ९० हजार ८५७ रुपयांची कर्जमाफीही घेतली. तसेच सर्व कुटुंबातील सर्व सभासदांची मिळून ४ लाख १ हजार ११० रुपयांची नियमबाह्य कर्जमाफीही घेतली.