नेवासा : तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत सुशोभिकरण व सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामुळे देवगडच्या वैभवात भर पडली आहे. रात्रीच्या वेळी तर प्रवेशद्वार ते गोपूर समोरील मार्गाला इंद्रधनुष्याचे रूप प्राप्त झाले आहे.
लॉकडाऊनच्या काळात श्रीक्षेत्र देवगडच्या श्री दत्त मंदिराला टाळे होते. या कालावधीत दत्त मंदिर संस्थानच्या गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली सुशोभिकरण काम सुरू केले होते. त्यात सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. देवगड संस्थान उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. जुन्या जाळया काढून त्याठिकाणी आकर्षक विद्युत खांब बसविण्यात येऊन रंगरंगोटी करण्यात आली आहे.
देवगड संस्थानच्या वतीने नक्षीदार व आकर्षक असे दक्षिणात्य शिल्पकलेनुसार हे प्रवेशद्वार तयार करण्याचे काम सुरू आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने पर्यावरणाचे संवर्धन होत असल्याने श्रीक्षेत्र देवगडचा परिसर वृक्षवल्लीने व फुलांनी नटलेला आहे.