अहमदनगर : जिल्ह्यात ४४ प्रादेशिक पाणी योजना कार्यान्वित आहे. या योजनांचा वीज बिलाचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्वावर संगमनेर तालुक्यातील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेची निवड के ली. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनेतून आठ दिवसांत प्रस्ताव मंजूर करून घेण्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी योजनांच्या अडचणीवर चर्चा करून त्या सोडवण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेत या योजनांच्या पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, सचिव, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी तालुकानिहाय योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, सभापती शरद नवले, मिरा चकोर, नंदा वारे,सदस्य बाजीराव गवारे, दत्तात्रय सदाफुले, संभाजी दहातोंडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील ४४ पैकी ३९ योजना पाणी पुरवठा समिती मार्फ त चालवण्यात येत असून उर्वरित ५ ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर चालवण्यात येत आहे. ४४ पाणी योजनांचे १६ कोटी ६५ लाख रुपयांचे वीज देयके थकीत आहे. हे अदा करण्यासाठी तरतूद करण्यासोबत योजनांची पाणीपट्टी वसुली, देखभाल दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याचे आवाहन आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत जवळपास सर्वच योजनांच्या चालकांकडून सरकारने पाणी योजना व्यापारी दरा ऐवजी कृषी दराने वीज बिल उपलब्ध करण्याची मागणी केली.योजना चालवत असतांना येणाऱ्या अडचणीचा पाढा यावेळी वाचून दाखवण्यात आला. पाणी योजनांना मीटर, फिल्टर यासह दुरूस्तीसाठी जि.प. देखभाल दुरूस्ती निधीतून पैसे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. (प्रतिनिधी)चांदा पाणी योजनेबाबत सदस्य दहातोंडे यांनी अडचणीचा पाढा वाचून दाखवला. या योजनेऐवजी पांढरीपूल एमआयडीसीतून पाणी देण्यात यावे, रांजणगाव पाणी योजनेचा साठवण तलाव चांदा गावाला द्यावा आणि चांदा ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून विहिरी खोदण्याची परवानगी मागितली.
पाणी योजनांसाठी सौर प्रकल्प
By admin | Published: October 15, 2016 12:35 AM