अहमदनगर : भाजपचे नेते सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत सुटले आहेत. भाजप सत्तेत असताना त्यांच्याही मंत्र्यांवर असे आरोप झाले होते. त्यावर किरीट सोमय्या गप्प का आहेत, असा सवाल पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला आहे.
अहमदनगरमध्ये बुधवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजपच्या सत्ताकाळातील तत्कालीन मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही चौकशी झाली पाहिजे. भाजप आधी सत्तेत असताना चिक्की घोटाळ्यामध्ये पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांच्यासह अनेक मंत्र्यांवर आरोप आहेत. त्याबद्दल सोमय्या बोलत नाहीत. सोमय्या यांनी ती कागदपत्रे ईडीकडे दिली पाहिजेत. भ्रष्टाचाराबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. आता तेही गप्प आहेत, याकडेही कवाडे यांनी लक्ष वेधले.