काही गोष्टी काळजी लावणाऱ्या आहेत; बाळासाहेब थोरात
By शेखर पानसरे | Published: July 2, 2023 05:15 PM2023-07-02T17:15:06+5:302023-07-02T17:15:32+5:30
संगमनेरात पत्रकारांशी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : आजची घटना लोकशाहीसाठी दुर्दैवी असून काही गोष्टी काळजी लावणाऱ्या आहेत. आपला पक्ष, आपले तत्त्वज्ञान हे घेऊन पुढे जायचे असते. विरोधी पक्षात राहूच नये, केवळ सत्तेत असावे. असा विचार केला तर लोकशाहीला तडा जातो, असे माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
रविवारी ( दि.०२) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे आदींनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेवटी जनतेचे न्यायालय आहे, जनताच भविष्यात निर्णय घेईल. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सत्ता मिळवण्यासाठी आम्ही काहीही करू. हे भारतीय जनता पक्षाचे घोषवाक्य आहे. जे एकमेकांवर टीका करत होते, ते आज एकत्र दिसत आहेत. काही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाहीत, हे देवेंद्र फडणवीस बोलत होते. आज त्या वाक्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी असो की, काँग्रेस आमचे लोकशाही जपण्याचा काम आहे, ते यापुढे आम्ही करत राहू. असेही थोरात म्हणाले.