अधिवेशनात एकाने डोळा मारला, नक्की झालं काय?; इंदोरीकर महाराजांनाही पडला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 02:38 PM2023-03-10T14:38:57+5:302023-03-10T15:30:33+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील केलवड गावात शिवजयंती निमित्त कीर्तन
नितीन गमे
राहाता (जि. अहमदनगर) : काल अधिवेशनात एकाने डोळा मारला, डोळा मारत असताना १५ मिनिटे चित्र दाखवण्यात आले, पण यात नक्की झालं काय ? असा सवाल निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलवड गावातील चालू शिवजयंती कीर्तनात उपस्थित केला. कीर्तनात ते असेही म्हणाले की, सोशल मीडियात व्हायरल झालेल्या दहावीच्या वेळापत्रकामुळे ८ तारखेला हिंदीचा होणारा पेपर ९ तारखेला दाखवण्यात आला. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, सोशल मीडियावर जास्त विश्वास ठेवू नये.
शुक्रवारी राहाता तालुक्यातील केलवड गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अधिवेशनात डोळा मारला असे इंदोरीकर बोलताच राजकीय जाणकारांत चर्चा सुरू झाली. गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले यावेळी अधिवेशन सभागृह आवारात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलण्यासाठी त्यांनी जागा उपलब्ध केली. ठाकरे बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समोरच्या एका व्यक्तीला डोळा मारला होता. परंतु तो डोळा मारण्यामागे कारण काय होते हे कुणाला समजू शकले नाही. त्यात आता इंदोरीकर महाराज यांनी कुणाचेही नाव न घेता डोळा मारल्याचे म्हणताच एकच चर्चा रंगली .
केलवड गावातील अयोध्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने गावात जंगी नियोजन करण्यात आले होते, शिवनेरी ते केलवड पायी शिवज्योत सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये गावातील नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव प्रा लक्ष्मण गोर्डे यांनी मोठी देणगी दिली तसेच अयोध्या युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उपसरपंच विशाल वाघे यांनी तगडे नियोजन केले होते . गावातील अनेक ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी मोठा हातभार लावला . त्यामुळे शिवजयंती निमित्त इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती .