अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात पारनेर येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक झाल्याचे वृत्त आले होते. पण ही दगडफेक उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर नव्हे तर आमदार विजय औटी यांच्या गाडीवर झाली आहे. ठाकरे यांची वाहने पुढे गेल्यानंतर मागे असलेल्या गाडीवर दगडफेक झाली. यात सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह एक शिवसैनिक जखमी झाला आहे.
निलेश लंके हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम करीत असताना त्यांनी तालुक्यात सेना मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. पण सध्या आमदार विजय औटी आणि लंके यांचे बिनसले आहे. कार्यक्रमास नीलेश लंके उपस्थित नव्हते. त्यामुळेच लंके यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली. नीलेश लंके यांची पत्नी राणी लंके या जिल्हा परिषद निवडणूकीत सेनेकडून निवडून आलेल्या आहेत. नीलेश लंके हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचा तयारीत आहेत.
शेतकरी मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे अहमदनगरला गेले आहेत.आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. निलेश लंके यांच्या गटाने दगडफेक केल्याचा आरोप आहे. निलेश लंके विजय औटी यांचे प्रखर विरोधक समजले जातात.