पाटोद्यात अंत्यसंस्कार : आई, वडिलांसह नातेवाईकांचा टाहोजामखेड : बोअरवेलमधून ३१ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढलेल्या सुनील मोरे या सहा वर्षीय चिमुरड्याचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ त्याच्या मृत्यूची वार्ता सोशल मीडियावरुन पाटोद्यात पोहोचली आणि गावावर शोककळा पसरली़ सोमवारी सायंकाळी सुनीलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़ सुनील हा मूळचा जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील असून त्याचे आई-वडील दुष्काळस्थितीमुळे शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे स्थलांतरित झाले होते. शनिवारी (दि़ २९) आईसोबत शेतात गेलेला सुनील मित्रांसोबत खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला होता. एनडीआरएफची टीम, अग्निशमन दलाचं पथक, पोलीस व डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करून रविवारी सायंकाळी तब्बल ३१ तासानंतर सुनीलला सुखरूप बाहेर काढले होते़ सुनीलला तातडीने उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र, सुनीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही वार्ता त्याचे जन्मगाव असलेल्या पाटोद्यात पोहोचताच गाव शोकसागरात बुडाले़ सुनीलचा मृतदेह सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता रुग्णवाहिकेतून पाटोदा येथे आणला़ मयत सुनीलची आई अंकिता, वडील हरिदास, आजीसह नातेवाईकांनी फोडलेल्या टाहोने गावकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले़ यावेळी सरपंच छगन खटके, उपसरपंच गफ्फार पठाण, माजी उपसरपंच समीर पठाण, महेश शेटे, ग्रामसेवक महेश जगताप, कृषी अधिकारी अशोक शेळके, ग्रामपंचायत सदस्य दादा राऊत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)सर्वधर्मीयांची प्रार्थनाबोअरममध्ये पडलेला सुनील सुखरूप बाहेर यावा, यासाठी ग्रामस्थांनी देवळात प्रार्थना केली. मुस्लीम समाजाने नमाज पठण केले तसेच बौद्ध धर्मियांनीही प्रार्थना केली़ मोरे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पाटोदा ग्रामपंचायतीने पाच हजार रुपये मदत दिली़ तसेच गावातून वर्गणी गोळा करुन मोरे कुटुंबाला गावातच स्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे, सरपंच छगन खटके यांनी सांगितले़
चिमुरड्या सुनीलच्या मृत्युने शोककळा
By admin | Published: May 02, 2016 11:14 PM