राहुरी : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन होताच कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली आहे़ बीड, उस्मानाबाद व लातूर विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर होताच संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उत्साहाने जमा झालेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या गावी परतावे लागले.शनिवारी (दि. २१ एप्रिल) सकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे महाराष्ट्र शासन आयोजित व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. बीड शहरातून भव्य व्यसनमुक्तीची दिंडी काढण्यात आली होती. आमदार विनायक मेटे, संध्या बडोले, वर्षा विलास, अविनाश पाटील आदी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दिंडी यशवंतराव चव्हाण सभागृहात आली़ व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटनही आमदार विनायक मेटे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यभरातून एक हजार कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सभागृहात जमा झाले होते. राज्यभरातून आलेले २१ विविध विषयांवरील स्टॉल लावण्यात आले होते. अचानक आचारसंहितेमुळे कार्यक्रम रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.शनिवारी विविध चर्चासत्र ठेवण्यात आले होते़ सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. राज्यभरातून आलेले व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते विचार विचारपीठावरून मांडणार होते. उद्या रविवारी महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार कार्यकर्त्यांना देण्यात येणार होते. मात्र सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने दूर अंतरावरून आलेले कार्यकर्ते माघारी फिरले.भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन सुरू करण्याची संधी सात वर्षांपासून महाराष्ट्राला लाभली़ दरवर्षी २ आॅक्टोबरला साहित्य संमेलन सुरू होत होते़ मात्र गेल्या तीन वर्षांपासून उशिरा व्यसनमुक्ती साहित्य संमेलन उशिराने सुरू होत आहे़ यंदा २१ मार्चचे संमेलन विधानसभा अधिवेशनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. २१ एप्रिल रोजी मुहूर्त काढण्यात आला़ मात्र विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला आहे़ संमेलनावर करण्यात आलेला खर्च वाया गेला आहे.
आचारसंहितामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला़ त्यामुळे दूर अंतरावरून आलेल्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरस झाला आहे़ दरवर्षी महात्मा गांधी जयंती दिवशीच व्यसनमुक्तीचे साहित्य संमेलन होणे गरजेचे आहे़ उन्हाची पर्वा न करता एक हजार कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते़ संमेलन रद्द झाल्याने व्यसनमुक्तीच्या कार्यकर्त्यांच्या विचार मंथनाला यानिमित्ताने बे्रक बसला आहे़ सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे दखील कार्यक्रमाला अनुपस्थित होते़ व्यसनमुक्तीवरील पुस्तकांचा आम्ही स्टॉल लावला होता़-संजय म्हसे, कार्यकर्ते, मातृभूमी व्यसन निर्मूलन संस्था, राहुरी.