आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील एका गावामध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वतीने गरजूंना धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रातिनिधीक धान्य देऊन खासदारांनी प्रस्थान करताच धान्याच्या पिशव्या घेण्यासाठी एकच गर्दी उसळली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांनी कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या जनतेला धान्य वाटप करीत आहेत. खासदारांच्या तालुक्यातील यंत्रणेने गरजवंतांची सविस्तर यादी तयार केली. नियोजनाप्रमाणे खासदार विखे आणि आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह कार्यकर्त्यांचा ताफा आढळगाव या गावात पोहोचला. फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करत प्रातिनिधिक स्वरूपात खासदार विखे यांनी धान्य वाटप केले आणि ते पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यांची पाठ फिरताच जमलेल्या लोकांना फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर पडला. धान्य बॅग मिळविण्यासाठी एकच गोंधळ उडाला. नियोजन केलेल्या लोकांना धान्य मिळण्याऐवजी भलत्यांनीच बॅगा घेऊन पळ काढला. १७५ गरजवंतांना धान्य वाटपाचे नियोजन असताना २२५ पेक्षा जास्त व्यक्तींनी गर्दी केली. त्यामुळे मान्यवरांनी कार्यक्रमस्थळ सोडल्याची चर्चा आहे. या सर्व गोंधळाला आवरण्याचा प्रयत्न करणाºया एका माजी पदाधिकाºयाच्या अंगावर एक तळीराम धावून गेला. वंचित राहिलेल्यांनाही धान्य मिळेल त्यासाठी पुन्हा नियोजन करण्याचे खासदारांची यंत्रणा सांगत होती. परंतु, गोंधळ करणारे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
खासदारांनी पाठ फिरवताच धान्य घेण्यासाठी उसळली गर्दी, तळीरामांमुळे डिस्टिन्संगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 7:16 PM