केडगाव : कोरोनामुळे उपासमार होत असलेल्या नगर तालुक्यातील जेऊर येथील बहुरूपी कुटुंबीयांच्या पालावर मदत पोहोचताच येथील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले.
जेऊर येथे बहुरूपी कुटुंब वास्तव्यास आहेत. या १३ कुटुंबीयांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली होती. याबाबत ‘लोकमत’मधून जेऊरच्या बहुरूपी कुटुंबांची कोरोनामुळे उपासमार अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. सभापती सुरेखा गुंड व उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या पुढाकारातून डॉन बॉस्को कॉन्व्हेंट व ऑक्झिलियम कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बहुरूपी यांच्या पालावर किराणा वाटप करण्यात आले. यावेळी डॉन बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज, सहसंचालक फादर नेल्सन, गायकवाड, संदीप गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे उपस्थित होते.
संदीप गुंड म्हणाले, यापुढेही गोरगरीब वंचित जनतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते मंडळाधिकारी वृषाली करोसिया, तलाठी गणेश आगळे यांच्या उपस्थितीत बहुरूपी कुटुंबीयांना गहू व तांदळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंडळाधिकारी वृषाली करोसिया यांनी महसूल विभागाच्या वतीने गरज असेल तेथे मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
ग्रामपंचायतीच्या वतीने बहुरूपी कुटुंबीयांना किराणा वाटप करण्यात आले. तसेच चिमुकल्यांना बिस्किटे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, उपसरपंच श्रीतेश पवार, आण्णासाहेब मगर उपस्थित होते. बहुरूपी कुटुंबीयांनी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
---
फोटो आहे.