अहमदनगर : दक्षिण लोकसभा निवडणूक लढविण्याची पक्षश्रेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचा आदेश मिळाला तर लोकसभा निवडणूक लढविणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युती होणार आहे, असे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी सांगितले.भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे १९ आणि २० रोजी नागपूर येथे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. बेरड बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अशोक कानडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काळोखे, शहर जिल्हाध्यक्ष नरेश चव्हाण, प्रदेश कार्यकारिणीचे पंडित वाघमारे आदी उपस्थित होते.दक्षिण लोकसभेसाठी शिवसेनेने त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रा. बेरड म्हणाले, शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांना काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र लोकसभेसाठी शिवसेना-भाजपची युती शंभर टक्के होणार आहे. युती झाली तर नगर दक्षिणेत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपचे काम करतील आणि शिर्डी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी भाजपचे कार्यकर्ते काम करतील.नगर दक्षिणेत मात्र आपण स्वत: इच्छुक आहोत. पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करू. भाजपमध्ये पक्षाने आदेश दिला तर तो पाळला जातो. लोकसभेचाही निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील.शिर्डीसाठी कानडे इच्छुकच्शिर्डी लोकसभा राखीव मतदारसंघ आहे. त्यामुळे अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना शिर्डीची उमेदवारी देणार का? या प्रश्नावर प्रा. बेरड म्हणाले, युती झाली नाही तर शिर्डीचीही जागा भाजप लढविणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती मोर्चाच्या उमेदवाराला जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण पाठिंबा राहील. शिर्डीच्या जागेसाठी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अशोक कानडे यांनी दावा केला आहे. उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक सक्षमपणे लढवू, असे कानडे यांनी सांगितले. याशिवाय भाजपकडून शिर्डीच्या जागेसाठी नितीन उदमले, चंद्रकात काळोखे, भाऊसाहेब वाकचौरे आदी इच्छुक आहेत.अनुसूचित जाती मोर्चाचे नागपूरला अधिवेशनच्भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे १९ आणि २० जानेवारीला नागपूरच्या दीक्षाभूमीवर अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी राज्यातून ५० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. नगर जिल्ह्यातून एक हजार कार्यकर्ते अधिवेशनासाठी रेल्वेने जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि अनुसूचित जातीसाठी केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती अधिवेशनात दिली जाणार आहे. १९ जानेवारीला केंद्रीय मंत्री थावरचंद्र गहलोत, महामंत्री भूपेंद्र यादव, तर २० जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय उपाध्यक्ष गौतम दुष्यंत यांचे भाषण होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीने अधिवेशनाचा समारोप होणार असल्याचे प्रा. बेरड यांनी सांगितले. भाजपच्या सर्वच आघाड्यांचे अधिवेशन होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती मोर्चाचे हे आयोजन पूर्वनियोजित असल्याचे बेरड म्हणाले.नगरचे महापौर दिल्लीत हीटच्दिल्ली येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही सहभाग घेतला होता. तिथे धुळ््याचेही महापौर आले होते. धुळ््यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र नगरमध्ये १४ जागा मिळूनही पक्षाचा महापौर कसा झाला, याची उत्सुकता पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, मंत्र्यांना होती. स्पष्ट बहुमत मिळविलेल्या धुळ््याच्या महापौरांपेक्षा नगरचे महापौर वाकळे यांच्यासोबत मंत्र्यांनी सेल्फी काढणे पसंत केले. नगरची महापौर निवडणूक दिल्लीपर्यंत गाजली. भाजपला नगरमध्ये न मागता पाठिंबा मिळाला. राष्ट्रवादीला पाठिंबा मागितला नव्हता, असे प्रा. बेरड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
आदेश मिळाल्यास दक्षिण लोकसभा लढविणार : भानुदास बेरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:50 AM