अहमदनगर : सोयाबीनला चांगला भाव मिळू लागल्याने, शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी केली. मात्र, सध्या अवघा चार ते पाच हजार रुपये क्विंटलचा भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यंदाच्या हंगामात वेळेवर पाऊस पडला. त्यातच सोयाबीनला विक्रमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागल्याने, मोठ्या प्रमाणावर शेतकरी या पिकाकडे वळले. जिल्ह्यात तब्बल ९९ हजार ४१७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. यंदा शेतकऱ्यांनी बाजरी, कपाशी या पिकांच्या तुलनेत सोयाबीनला प्राधान्य दिले, तसेच यंदा हवामानाच्या लहरीपणामुळे उत्पादनातही कमालीची घट झाली. आता दरही कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
-----
सोयाबीनचा पेरा हेक्टरमध्ये...
वर्ष पेरा
२०१७ ७५,१७४
२०१८ ८९,८४४
२०१९ ५२,२८२
२०२० ५४,२९४
२०२१ ९९,४१७
-----
सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल
जानेवारी २०२० ७,०००
जून २०२० ८,०००
ऑक्टोबर २०२० ८,५००
जानेवारी २०२१ ८,०००
जून २०२१ ९,५००
सप्टेंबर २०२१ ५,०००
-----
खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करू?
मोठा खर्च करून सोयाबीन पीक केले. त्यात सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिली, नंतर ढगाळ हवामानामुळे रोग पडला. फवारणीसाठी मोठा खर्च आला. आता उरले सुरले जे पीक पदरात पडलं, त्यालाही भाव नाही. पाच रुपये क्विंटलच्या भावात खर्च निघणे मुश्कील आहे.
- बाबासाहेब वाघमोडे, शेतकरी, साकत खुर्द.
----
सोयाबीनचे पीक जोमात असताना मात्र, फळ धारणाच नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यानंतर, अचानक झालेली सततची रिमझिम आणि आता सोयाबीनला शेंगा लागल्या. मात्र, शेंगांत दाणेच भरले नाहीत. त्यात सोयाबीनचे भाव कमी झाले. मग शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे, हा मोठा प्रश्न आहे.
- संतोष धावडे, शेतकरी, गुंडेगाव.
----
हमीभावाच्या दीडपट अधिक भाव
सध्या सोयाबीनची बाजारात फारशी आवक नाही. पावसामुळे शेतकऱ्यांना तोडणीच्या कामात अडचणी येत आहेत. आर्द्रता तपासणी करूनच भाव ठरविला जातो. सुका माल व भिजलेला माल, याची प्रतवारी होऊन भाव निश्चित होतो. सरकारने आयात धोरण स्वीकारल्याने त्याचा प़रिणाम भावावर होऊ शकतो. मात्र, सध्या ५ हजारांच्या पुढे भाव असून, हे भाव आधारभूत किमतीच्या दीडपट जास्त आहेत.
- विजय कोथंबिरे, व्यापारी, नगर बाजार समिती.