राहुरी : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्रात विकसित केलेले ‘केडीएस - ९९२’ हे सोयाबीन पिकाचे वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आले आहे.
दक्षिण भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा व आंध्रप्रदेश या पाच राज्यांत या वाणाच्या लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
केंद्रीय सोयाबीन वाण ओळख व प्रसार समितीची बैठक १२ मार्च २०२१ रोजी इंदोर येथे पार पडली. बैठकीत देशाच्या विविध प्रांतांसाठी एकूण आठ वाण प्रसारित करण्यात आले. यामध्ये प्रसारित झालेल्या आठ वाणांपैकी केडीएस - ९९२ हा सर्वाधिक उत्पादन देणारा वाण ठरला असून, त्याची उत्पादकता ६ क्विंटल अधिक आहे. याशिवाय हा वाण दक्षिण भारतात पाने खाणाऱ्या अळीसाठी काही प्रमाणात सहनशील, तर तांबेरा रोगास मध्यम, प्रतिकारक्षम सिध्द झाला आहे. १०० ते १०५ दिवसात हा वाण पक्व होतो. सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांनी हा वाण विकसित केला आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. टी. आर. शर्मा, सोयाबीन अनुसंधान संस्थेच्या इंदोरच्या संचालक डॉ. नीता खांडेकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. संजीव गुप्ता व इतर मान्यवर सदस्य यावेळी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, डॉ. अशोक फरांदे, डॉ. दिलीप कटमाळे, डॉ. मिलिंद देशमुख यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
...
१७राहुरी सोयाबीन वाण
..
ओळी-महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले सोयाबीनचे ‘केडीएस-९९२’ वाण.