अहमदनगर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने सुरू असलेल्या योजनांचा निर्धारित वेळेतच लाभ मिळावा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता़ यावेळी आक्रमक झालेल्या कामगारांनी कार्यालय इमारतीचे गेट तोडून आत प्रवेश केला़ तसेच मुख्य गेटला टाळे ठोकून जोरदार घोषणाबाजी केली़ आंदोलनादरम्यान कामगार आक्रमक झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ कॉ़ बाबा आरगडे, कॉ़ अजित नवले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले़ आंदोलनात जिल्ह्यातील बांधकाम कामगरांच्या सात संघटनांतील ६०० पेक्षा जास्त कामगार सहभागी झाले होते़ त्यात महिलांचीही संख्या लक्षणीय होती़ यावेळी आरगडे म्हणाले, जिल्ह्यात ३५ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी आहे़ कामगारांसाठी विविध योजनांची तरतूद आहे़ कामगार कल्याण मंडळाकडे हजारो कोटी रुपये पडून आहेत़ कामगारांना मात्र, हक्कांच्या योजनांचाही लाभ दिला जात नाही़ कामगारांचे हजारो प्रस्ताव कार्यालयात धूळखात पडून आहेत़ भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कामगारांना संघर्ष करावा लागत आहे़ डॉ़ करण घुले म्हणाले, बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही मागण्या मार्गी लागत नाही़ त्यांच्यासाठी नवीन योजना सुरू केल्या जात नाहीत मात्र, आहे त्या योजनांचाही लाभ दिला जात आहे़ येणाऱ्या काळात कामगारांना मेडिक्लेम मिळावा, यासाठी आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले़ यावेळी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, डॉ़ महेबुब सय्यद, कॉ़ अजित नवले यांनीही मनोगत व्यक्त केले़ सहाय्यक कामगार आयुक्त पाटणकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले़ या आंदोलनात नंदू डहाणे, बहिरनाथ वाकळे, जयेश कांबळे ,सदाशिव साबळे,संजय दुधाडे ,अशोक उगलमुगले, अनिता कोंडा यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)आंदोलनादरम्यान सहाय्यक कामगार आयुक्त पाटणकर निवेदन स्वीकारण्यास न आल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली़ पोलिसांच्या मध्यस्तीने अजित नवले, महेबुब सय्यद, बाबा आरगडे यांनी पाटणकर यांची भेट घेऊन निवेदन दिले़ मागण्यांची पूर्तता कधी करणार याचे ठोस आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्याचा पवित्रा यावेळी घेण्यात आला पाटणकर यांनी विभागीय कामगार आयुक्त यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधला़ नगरमध्ये येऊन कामगार नेत्यांची भूमिका समजून घेत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन फोनवरून त्यांंनी कामगारांना दिले तसेच नगरमध्ये तातडीने दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले़ .
कामगार आयुक्त कार्यालयावर हल्ला बोल
By admin | Published: July 05, 2016 11:56 PM